जगातील पहिला देश ठरला : पीरियड्स प्रॉवर्टी संपविण्याची मोहीम
वृत्तसंस्था/ एडिनबर्ग
महिलांना पीरियडशी (मासिक पाळी) संबंधित सर्व उत्पादने मोफत मिळण्याची सुविधा प्रदान करणारा स्कॉटलंड जगातील पहिला देश ठरला आहे. स्कॉटिश संसदेने देशात पीरियड प्रॉडक्ट्स फ्री प्रोविजन स्कॉटलंड विधेयक संमत केले आहे.. या कायद्याच्या अंतर्गत स्थानिक प्रशासनाला पीरियड प्रॉडक्ट्स मोफत उपलब्ध करावे लागणार आहेत. परंतु स्कॉटलंडमध्ये 2018 पासूनच सार्वजनिक ठिकाणी मोफत टँपॉन आणि सॅनिटरी पॅड दिले जात आहेत.
यासंबंधीचे विधेयक खासदार मोनिका लेनन यांनी मांडले होते. 2016 पासून पीरियड्स पॉवर्टी संपविण्यासाठी त्या देशात मोहीम चालवत आहेत. स्कॉटिश संसदेचा हा निर्णय महिला आणि मुलींच्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. प्रत्येकाला आता सन्मान मिळणार आहे. सार्वजनिक जीवनात मासिक पाळीवर चर्चा होतेय हाच मूळात एक मोठा बदल आहे. हा विषय आता मुख्य प्रवाहात असल्याचे उद्गार लेनिन यांनी काढले आहेत.
नव्या कायद्यामुळे पीरियड्सशी संबंधित उत्पादनांना सामुदायिक केंद्रे, तरुणाईचे क्लब, शौचालये आणि फार्मसींमध्ये ठेवण्यात येणार आहे. महिला आणि युवतींसाठी निश्चित ठिकाणांवर टॅम्पॉन आणि सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करण्यात येणार आहेत.









