वृत्तसंस्था / मुंबई
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावलाच्या वडिलांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. पीयूषचे वडील प्रमोदकुमार चावला (वय 60) यांना गेल्या काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू होते.
अलीगडमध्ये जन्मलेल्या 32 वर्षीय पीयूष चावलाने राष्ट्रीय क्रिकेटमध्ये गुजराथचे प्रतिनिधीत्व करताना 136 प्रथमश्रेणी सामन्यात 445 बळी घेतले आहेत. तसेच त्याने तीन कसोटी, 25 वनडे आणि सात टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयपीएल स्पर्धेत यावर्षी तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता पण त्याला या हंगामात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुंबई इंडियन्स संघातर्फे पीयूषच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणनेही पीयूष चावलाच्या वडिलांना आदरांजली वाहिली आहे.









