प्रतिनिधी / काणकोण
भाजपाच्या दक्षिण गोवा समितीचे उपाध्यक्ष असलेल्या महेश नाईक यांच्या मुलाने पैंगीण येथील एका युवतीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात महेश नाईक यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार पीडित युवतीच्या वडिलांनी काणकोणच्या पोलीस दिली होती. ती तक्रार 24 रोजी पीडित युवतीच्या वडिलांनी मागे घेतल्यामुळे एक प्रकारे या प्रकरणी आवाज उठविणाऱयांची हवाच गेली आहे.
दरम्यान, हे प्रकरण घडून 8 दिवस झाले आहेत. सदर पीडित युवती इस्पितळात उपचार घेत आहे आणि या प्रकरणात जो युवक गुंतला आहे त्याचे वडील पीडित युवतीच्या वडिलांना धमकी देत असल्याची तक्रार करून देखील काणकोणचे पोलीस दबावाखाली येऊन हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ऍड. वरद म्हार्दोळकर, अर्चित नायक, अखिलेश यादव, आशिष तोरस्कर, हिमांशू तुयेकर, प्रलय भगत, प्रवीर भंडारी आणि अन्य पदाधिकाऱयांनी 24 रोजी पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांची भेट घेत जाब विचारला. पीडित युवतीला न्याय दिला नाही, तर रस्त्यावर येण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
त्याचबरोबर इतके दिवस हे प्रकरण ताणून धरलेले गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव जनार्दन भंडारी, महादेव देसाई यावेळी अनुपस्थित होते. पीडित युवतीला न्याय मिळावा आणि या प्रकरणात गुंतलेल्या युवकाचे वडील, जे भाजपाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत यापूर्वी प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे मोहनदास लोलयेकर, प्रशांत नाईक, आम आदमी पक्षाचे संदेश तेलेकर, जागरूक नागरिक संघटनेचे प्रतिनिधी शांताजी गावकर, पल्लवी भगत, लोलये, पैंगीणचे सरपंच, पंच आणि काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱयांनी पोलीस स्थानक गाठले होते. पीडित युवतीच्या वडिलांनी धमकी देण्यात आल्याची तक्रार मागे घेतल्याने ते उघडे पडले आहेत.









