क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (पीटीआय) माजी कर्मचारी मायकल सिकेरा यांचे काल सकाळी अल्प आजाराने निधन झाले. मागील सहा महिन्यापासून ते आजारी होते. कुडतरी येथील रहिवासी मायकल हे पीटीआयचे तांत्रिक कर्मचारी होते.
पीटीआयसाठी फुटबॉल तसेच इतर खेळांचे वार्तांकन त्यांनी केले. फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय फुटबॉल लीग, नेहरु चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वयोगटातील फुटबॉल स्पर्धा, गोवा फुटबॉल संघटनेच्या विविध फुटबॉल स्पर्धाच्या वार्तांकनांसमवेत त्यांनी विविध राष्ट्रीय खेळातील स्पर्धा, रणजी क्रिकेट तसेच वयोगटातील बीसीसीआयच्या क्रिकेट स्पर्धेतील त्यांनी पीटीआयसाठी वार्तांकन केले होते. गोवा क्रीडा पत्रकार संघटनेचे माजी सदस्य असलेले 61 वर्षीय मायकल सिकेरा यांच्यावर आज दफनभुमीत अंतिम संस्कार होणार आहेत.









