मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले आव्हान
प्रतिनिधी / मडगाव
पोलीस खात्यात ‘पीएसआय’च्या जागा भरण्यासाठी 75 लाख प्रति पोस्ट प्रमाणे लिलाव केला जात असल्याचा आरोप फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. त्या संदर्भातील पोस्ट काल समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, विजय सरदेसाई यांनी तसे पुरावे सादर करावे. पुरावे सादर केल्यास जर कोणी असे कारनामे करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
पोलीस खात्यात विविध जागा भरण्यासाठी सरकारने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्या संदर्भात विजय सरदेसाई 75 लाख रुपयांची विधाने करतात, ती त्यांनी सिद्ध करून दाखवावी आणि जर त्यांनी पुरावे सादर केले तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
आपल्या सरकारात नोकऱया विकल्या जाणार नाहीत
आपल्या सरकारात नोकऱया विकल्या जाणार नाहीत. जे उमेदवार नोकर भरतीसाठी परीक्षा देतील व उत्तीर्ण होतील व पात्र असतील त्यांनाच नोकरीची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केवळ विजय सरदेसाईच नव्हे तर आपण जनतेला सुद्धा आवाहन करतो की, जर कोणी नोकरभरतीसाठी पैसे मागत असल्याचे आढळून आल्यास त्याची कल्पना आपल्याला द्यावी, आपण योग्य ती कारवाई करेन.
सरकारची बदनामी करण्यासाठी जर कुणी दलाल फिरत असले तर अशा दलालावर विश्वास ठेऊ नका. हे दलाल काँग्रेसच्या काळात होते. ते भाजप सरकारच्या काळात नाही आणि चुकून सुद्धा कोणी कोणाला फसविण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना अटक करण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे.
वाळपईत महिलेला झाली होती अटक
सरकारी नोकरी देत असल्याचे सांगून पैसे घेतल्याची तक्रार वाळपई पोलीस स्थानकावर नोंद झाल्यानंतर एका महिलेला अटक करण्यात आली होती असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
नोकरभरतीसाठी दलाली करणाऱया व्यक्ती असू शकतात. पण, जनतेने त्यांना बळी पडू नये आणि जर कोणी असे प्रकार करीत असेल तर त्याचा आपल्या कार्यालयाशी किंवा सरकारशी काडीचा ही संबंध नाही. जर कोणी नोकरीसाठी पैशांची मागणी करीत असल्यास जनतेने थेट तक्रार करावी, त्या तक्रारीनुसार नक्कीच आपले सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.









