1.35 लाख कोटींचे उत्पादन घेण्याचे कंपन्यांचे आश्वासन – 13 क्षेत्रांना मिळतोय लाभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटी हार्डवेअर क्षेत्रासह इतर क्षेत्रातील 19 कंपन्यांनी पीएलआय योजनेकरिता अर्ज सादर केला आहे. या अर्जाअंतर्गत 1.35 लाख कोटी रुपयांचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे आश्वासन संबंधीत कंपन्यांकडून देण्यात आले आहे.
देशात निर्मिती प्रक्रियेला जोर देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’अंतर्गत विविध उद्योजकांना त्यांचे व्यवसाय करण्यासाठी पीएलआय स्कीम अंतर्गत सवलतीची योजना दिली जात आहे. सरकारने पीएलआय स्कीम अंतर्गत 13 क्षेत्रांना उत्पादनामध्ये सवलतीचा लाभ मिळवून दिला आहे. यामध्ये आयटी हार्डवेअर क्षेत्राचा समावेश आहे. आयटी हार्डवेअर क्षेत्रातील एकूण 19 कंपन्यांनी पीएलआय स्कीमचा लाभ मिळवून घेण्यासाठी अर्ज सादर केला आहे. यामध्ये ऍपल कंपनीच्या फॉस्ककॉन, विस्ट्रॉन, डेल आणि लावा या कंपन्यांचाही समावेश आहे.
पीएलआय स्कीमअंतर्गत आयटी हार्डवेअर क्षेत्राने 1.6 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाची हमी सरकारला दिली आहे. यामध्ये स्थानिक कंपन्यांनी 25,000 कोटी रुपयांच्या उत्पादनाची तयारी दर्शविली आहे. यामध्ये डिक्सन, इन्फोपॉवर, भगवती, नियोलिंक, नेट वेब अशा कंपन्यांचा समावेश आहे.
भारतातच निर्मिती प्रक्रियेला बळ देण्यासाठी गेल्या 3 मार्चला सरकारने पीएलआय अर्थात प्रोडक्ट लिंकड् इन्सेटीव्ह ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत उद्योजकांना सवलत दिली जाते.
37,500 जणांना रोजगार मिळण्याची शक्यता
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले, आयटी, हार्डवेअर क्षेत्राने पीएलआय स्कीमचा चांगला लाभ उठविला आहे. या स्कीमचा फायदा उठविण्यासाठी स्थानिक कंपन्यांसह विदेशी कंपन्यांकडूनही अर्ज दाखल केला जात आहे. या पीएलआय योजनेंतर्गत सुरू होणाऱया उद्योगांमधून येणाऱया चार वर्षांमध्ये 37,500 जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याबरोबर अप्रत्यक्षरित्या 3 पट रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.









