संतोष नानचे यांचे बँक ऑफ इंडिया शाखाधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर / दोडामार्ग:
केंद्र सरकारच्या अंतर्गत पी. एम. स्वनिधीमधील कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करण्याची मागणी दोडामार्गचे नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी गुरुवारी केली. दोडामार्गच्या बँक ऑफ इंडिया शाखेत अनेकांची प्रकरणे रखडली असून त्यासंदर्भात गुरुवारी नानचे यांनी शाखाधिकारी कैलाशचंद्र सहा यांची भेट घेतली व चर्चा करुन निवेदन दिले.
नानचे यांच्यासोबत यावेळी दोडामार्गचे माजी सरपंच पांडुरंग बोर्डेकर उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्ग व त्याच्या अनुषंगाने गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊन काळात अनेक छोटय़ा मोठय़ा उद्योग व्यवसायांना खीळ बसली. अनेक व्यापाऱयांना मंदीला सामोरे जावे लागले. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पी.एम. स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी अर्थात पी.एम.स्वनिधींची योजना केंद्रशासनाने ठरवली आहे. या योजनेंतर्गत कर्जाचा लाभ अशा सर्व व्यापाऱयांना त्यांची व्यापार धंद्याची घडी नीटपणे बसविण्यासाठी होऊ शकतो. त्यानुसार कसई-दोडामार्ग शहरातील नगरपंचायत हद्दी अंतर्गतच्या अनेकांचे प्रस्ताव बँक ऑफ इंडियाच्या दोडामार्ग शाखेत आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे प्रस्ताव विनाकारण रखडून पडले असून त्यामुळे या योजनेचा म्हणावा तसा लाभ संबंधितांना घेता आलेला नाही. याकडे नानचे व बोर्डेकर यांनी लक्ष वेधले. हे प्रस्ताव किरकोळ त्रुटी काढून न रखडवता त्याला तातडीने मंजुरी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, बँकेच्या प्रशासकीय कामकाजातील त्रुटी वरिष्ठ कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून दूर कराव्यात अन्यथा शाखेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा संबधित योजनेच्या मागणी केलेल्या अनेकांनीही बँक प्रशासनाला दिला आहे.









