नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी संध्याकाळी सात वाजता ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम पूर्णतः ऑनलाईन होणार असून तो जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी परीक्षेचा तणाव कशा प्रकारे दूर करता येईल याविषयी विद्यार्थी, पालकांबरोबरच शिक्षकांशीही बातचीत करणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी #ExamWarriors हा हॅशटॅग वापरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा नवीन प्रकार, विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बुधवारी ७ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा एकूण १४ लाख जणांनी नोंदणी केली आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रम चौथ्यांदा होणार आहे.
परीक्षा पे चर्चामध्ये पहिल्यांदा पालकांना संधी
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून नरेंद्र मोदी त्यांना मार्गदर्शन करतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी २.६२ लाखांहून अधिक शिक्षकांनी, १०.३९ लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील नोंदणी केली आहे.









