जिह्यातील शेतकऱयांना आतापर्यंत मिळाली 105 कोटींची रक्कम
नोंदणी झालेले 42 हजार शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
शेतकऱयांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गतवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (पीएम किसान) लागू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेनुसार शेतकऱयांच्या बँक खाती वर्षाला तीन हप्त्यात मिळून सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एक लाख 69 हजार 162 शेतकऱयांची या योजनेंतर्गत नोंदणी झाली आहे. यातील सव्वालाखाहून अधिक शेतकऱयांना पहिला हप्ता मिळाला आहे. तर काही शेतकऱयांना सहाव्या हप्त्यापर्यंतही लाभ मिळालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात या योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे एक अब्ज पाच कोटींहून अधिक रक्कम शेतकऱयांना मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
अजूनही नोंदणी
गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली. त्यावेळी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी योजना जाहीर करण्यात आली. यात लागवडीलायक एकूण क्षेत्र 2 हेक्टरपर्यंत असणाऱया शेतकऱयांना 2 हजार रुपये याप्रमाणे वर्षभरात तीन हप्ते मिळून सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. यासाठी काही निकष होते. तसेच कोणत्या शेतकऱयांना याचा लाभ मिळू शकतो, या बाबतचे नियमही निश्चित करण्यात आलेले होते. मात्र, त्यानंतरच्या टप्प्यात जून 2019 मध्ये शासनाने यातील दोन हेक्टरपर्यंतच्याच लाभार्थ्यांना लाभ देण्यासंदर्भात असलेली अट काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांनाही लाभ देण्याबाबतची कार्यवाही गतवर्षीपासून सुरू करण्यात आली. आजही या योजनेंतर्गतचे लाभार्थी नावनोंदणी करत आहेत.
सिंधुदुर्गात 1 लाख 70 हजार नोंदणी
सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा विचार केला तर या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 लाख 69 हजार 162 शेतकऱयांनी योजनेंतर्गत लाभासाठी नावनोंदणी केलेली आहे. यापैकी 1 लाख 27 हजार 134 शेतकऱयांना पहिला हप्ता मिळाला आहे. 1 लाख 14 हजार 914 शेतकऱयांना दुसरा हप्ता, 1 लाख 802 शेतकऱयांना तिसरा हप्ता, 78 हजार 555 शेतकऱयांना चौथा हप्ता, 72 हजार 926 शेतकऱयांना पाचवा हप्ता तर 31 हजार 217 शेतकऱयांना सहावा हप्ता मिळाला आहे. यात सुरुवातीच्या टप्प्यातच नावनोंदणी केलेल्या शेतकऱयांना योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून लाभ मिळत असला तरीही नंतर नोंदणी होणाऱया योजनेच्या त्या-त्या टप्प्यापासूनच लाभ मिळत आहे. जिल्हय़ातील शेतकऱयांना आतापर्यंत मिळून 1 अब्ज 5 कोटी 10 लाख 96 हजार एवढी रक्कम मिळाली आहे.
काही चुकांमुळे हप्ते अडकून
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱयांपैकी अद्याप 42 हजार शेतकऱयांना पहिला हप्ता सुरू व्हावयाचा आहे. हप्ता सुरू होण्याचे शिल्लक असलेल्या शेतकऱयांमध्ये काहींच्या नोंदणीतील आधारकार्ड नंबरमध्ये चुका, बँक अकाऊंटच्या नंबरमध्ये चुका तर काही ठिकाणी नावात बदल झाल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे हप्ते जमा होण्याची प्रक्रिया अडकून पडल्याचे समजते. मध्यंतरी लॉकडाऊनच्या कालावधीत ही प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता शेतकऱयांना लाभ मिळवून देण्याच्यादृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे समजते. तसेच अद्यापही नोंदणी नसलेल्या शेतकऱयांना थेट महा ई सेवा केंद्रांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करता येत आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील नोंदणी व टप्पेनिहाय शेतकरी
नोंदणी/टप्पा शेतकरी रक्कम
नोंदणी 1,69,162 ………
टप्पा 1 1,27,134 25,42,68,000
टप्पा 2 1,14,914 22,98,28,000
टप्पा 3 1,00,802 20,16,04,000
टप्पा 4 78,555 15,71,10,000
टप्पा 5 72,926 14,58,52,000
टप्पा 6 31,217 6,24,34,000









