हाथरस प्रकरणी मोठा खुलासा : दंगल भडकविण्यासाठी विदेशातून अर्थसहाय्य : ईडीकडून नोंदविला जाणार गुन्हा
वृत्तसंस्था / लखनौ
हाथरस प्रकरणी बुधवारी मोठा खुलासा झाला आहे. ईडीनुसार मॉरिशसमधून पीएफआयला 50 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. वादग्रस्त संघटनेला 100 कोटींहून अधिकची आर्थिक मदत मिळाली असून यातही केवळ मॉरिशसमधूनच 50 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. हाथरस प्रकरणावरून उत्तरप्रदेशात जातीय दंगल भडकविण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यात एका संकेतस्थळाच्या विरोधात हाथरस पोलिसांकडून गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे.
याप्रकरणी बुधवारी प्राप्त ईडीचा हा प्रारंभिक अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पीएफआयला मॉरिशसमधून 50 कोटींच्या वित्तसहाय्यावर अनेक प्रकारचे सवाल उपस्थित होत आहेत. विदेशातून आलेल्या या रकमेतून उत्तरप्रदेशातील वातावरण बिघडविण्याचा कट रचण्यात येत होता, असे बोलले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत दिल्लीहून हाथरस येथे जात असलेल्या 4 जणांना अटक केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनेही यापूर्वी राज्याला दंगलींमध्ये लोटण्याचा कट रचण्यात आल्याचे म्हणत विदेशी संघटनांनी आर्थिक बळ पुरविल्याचा आरोप केला होता.
राज्यात जातीय हिंसाचार भडकविण्याचा कट रचला जात असून याकरता विदेशातून आर्थिक रसद पुरविण्यात येत असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून इनपूट मिळाल्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला होता. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर अंमलबजावणी संचालनालय सक्रीय झाले होते. ‘कार्ड डॉट कॉम’ या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेले संकेतस्थळ ‘जस्टिसफॉरहाथरस’च्या विरोधात ईडीकडून पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोदंविला जाऊ शकतो.
प्रारंभिक तपासात एका संशयास्पद संघटनेकडून हिंसक निदर्शनांसाठी वित्तीय मदत देण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील हिंसाचारासाठी ज्याप्रकारे संकेतस्थळाचा वापर करण्यात आला होता, तसाच प्रकार हाथरस प्रकरणातही घडला आहे. राज्यभरात जातीय हिंसाचार भडकविण्यासाठी हाथरसच्या घटनेशी संबंधित खोटी माहिती प्रसारित करण्यासाठी एक संकेतस्थळ निर्माण करण्यात आले होते.