वाळपई / प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील एका खाणीवरून खनिज मालाची वाहतूक करण्यात आली होती. मात्र ही वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यासंदर्भात सरकारच्या संबंधित यंत्रणेने याची कसून चौकशी करावी अशा प्रकारचे मागणी करणारी तक्रार सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी वाळपई पोलीस स्थानकावर केली आहे .
त्याचप्रमाणे या खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या एकूण 26 ट्रकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सदर तक्रारीत करण्यात आलेली आहे .
याबाबतची माहिती अशी की दोन दिवसापूर्वी अचानकपणे पिसुर्ले पंचायत भागातून भर पावसामध्ये खनिज मालाची वाहतुक करण्यात आली होती. यासंदर्भात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करून या भागातील नागरिकांनी ही वाहतूक अडवून धरली होती. ही वाहतूक वैभवी ट्रान्सपोर्ट नावेली यांच्याकडून करण्यात येत असून चालकांकडे कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले होते. यामुळे ही वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर होती. त्याची कसून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी हनुमंत परब यांनी केली आहे.
ही वाहतूक करण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला सदर मार्ग खनिज वाहतुकीसाठी कायदेशीररित्या उपलब्ध नसून यासाठी वेगळा मार्ग आखण्यात आला होता .मात्र सदर मार्गाचा अवलंब न करता मुद्दामपणे पिसुर्ले लोकवस्तीतून जाणाऱया मार्गावर ही वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक स्तरावर त्रास सहन करावे लागले. बेकायदेशीरपणे करण्यात आलेली खनिज मालाची वाहतूक या संदर्भात सरकारने त्वरित कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा हनुमंत परब यांनी दिला आहे. याची गंभीर दखल घेऊन वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी भागांमध्ये भेट देऊन या संदर्भात संपूर्णपणे पाहणी केली.









