पर्यावरण रक्षणात पिशवीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न : अनेक गरजू महिलांच्या हातांना मिळाले काम
मनीषा सुभेदार / बेळगाव
‘पिशवी’ म्हटले की सामान्य वाटते. आणि ‘बॅग’ म्हटले की लगेच तिचा भाव वधारतो. फरक आपल्या दृष्टिकोनाचा, मानसिकतेचा पिशवीचा उगम खूप आधी झाला आहे. परंतु बॅग आणि पर्स यांनी तिच्यावर आक्रमण केले आणि पिशवी काहीशी मागे पडली. वर्षानुवर्षे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया ‘पिशवी’ला पुन्हा तिचा मान प्राप्त करून देत पर्यावरण रक्षणात तिचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न ‘प्रयास’ ही संस्था करत आहे.
कोरोना काळात सर्वत्र वेगवेगळय़ा जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित केले जात आहेत. बहुसंख्य किट प्लास्टिक पिशव्यांचे आहेत. मात्र प्रयासने हे किट जाणिवपूर्वक कापडी पिशव्यांमध्ये देण्यास सुरुवात केली आहे. या एका प्रयत्नामुळे अनेक महिलांच्या हाताना काम मिळाले आहे. शिवाय प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होऊन कापडी पिशव्यांचा वापर वाढला आहे. ‘प्रयास’च्या या प्रवासाची कहाणी मोठी रंजक आहे. याची सुरुवात झाली ती कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये.
पर्यावरणप्रेमी असणाऱया, पाण्याचा थेंबनथेंब वाचवावा यासाठी काम करणाऱया ‘अमूल्य बूंद’च्या संस्थापिका आरती भंडारे यांनी शहरातील परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी फेरफटका मारला असता दोन नव्हे तर एक वेळच्या जेवणाची भ्रांत असणारी अनेक कुटुंबे त्यांना आढळून आली. या कुटुंबासाठी त्यांनी किट तयार करायचे ठरविले आणि त्याचे वाटपही केले. परंतु पर्यावरण प्रेमींनी दिलेले प्लास्टिक पिशक्यांमधील हे किट पाहून सोशल मीडियावर कोणीतरी त्यांना हिणवले. त्याचा राग न मानता आरती यांनी अंर्तमुख होऊन विचार केला व कापडी पिशव्यांमध्ये किट देण्याचे ठरविले. दरम्यान, नोकरी गमावलेल्या एका मैत्रिणीने मला मदत करावयाची आहे असे सांगताच सध्या नोकरी नाही तर पैसे खर्च करू नकोस तुला दुसरे काही देणे शक्मय आहे का, असे आरती यांनी मैत्रिणीला सांगितले व जुने बेडशीट, पडदे पाठवून दे असा पर्यायही सूचविला. त्यातूनच ‘प्रयास’ आणि ‘पिशवी’ यांचा उगम झाला.
यानंतर पिशव्या शिवून देणाऱया कोणी महिला आहेत का? याची माहिती घेऊन आरती भंडारे यांनी अनेक कल्पक संकल्पना राबवणाऱया अमृता पुणेकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. अमृता यांनी कापडी पिशव्यांचे डिझाईन व कटिंग करण्याची जबाबदारी घेतली. या ग्रुपमध्ये सुमा जैन या सहभागी झाल्या. सुमा जैन यांनी शिवणकाम करणाऱया गरजू महिलांचा शोध घेतला. महिला उपलब्ध होताच आरती यांनी बेळगावकरांना जुन्या साडय़ा, बेडसीट देण्याचे आवाहन केले. लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आरती यांच्याकडे आलेले कपडे पूर्णतः सॅनिटाईज करून त्याच्या पिशव्या तयार करण्याचे काम सुरू झाले.
कामाचा व्याप वाढला
आज या कामाचा व्याप वाढला आहे. अन्नपूर्णा पाटील, वसंता पाटील, सविता सुर्वे, अंजली जैन, नंदीनी गुरव, अशा महिला पिशव्या तयार करत असून त्याच्यातूनच किट दिले जातात. इतकेच नव्हे तर आरती यांच्या संकल्पनेतून कापडी पिशव्या आणि अमृता यांच्या संकल्पनेतून प्रसूती झालेल्या महिलांसाठी दुपटी, डायपर किट व टोपी तयार करण्यात आली. या किटला ‘वात्सल्य’ नाव देण्यात आले. विशेष म्हणजे प्रसूती झालेल्या महिलांना डिंक आणि अळिवाचे लाडू, खजूर, मोरावळा असे साहित्य देण्यात आले. तर गर्भवती व गरजू महिलांना सुद्धा पौष्टिक आहाराचे साहित्य देण्यात आले. या किटला ‘ममता’ असे नाव देण्यात आले आहे. किट देताना एक किंवा दोन मुले असलेल्या महिलांनाच किट देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ज्यांना खरोखरच गरज आहे याची पडताळणी करूनच हे किट देण्यात आले आहे.
परदेशातील बेळगावच्या तरुणांकडूनही उपक्रमाला साहाय्य
या उपक्रमासाठी ज्यांना पैसे देणे शक्मय नव्हते त्यांनी कपडे उपलब्ध करून दिले, अनेकांनी देणग्या दिल्या. परदेशात काम करणाऱया बेळगावच्या तरुणांनी सुद्धा या उपक्रमाला साहाय्य केले आहे. पिशवी या उपक्रमामुळे गरजू महिलांना काम मिळाले. एका पिशवीमागे त्यांना ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिकुल काळात महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. लॉकडाऊनमुळे कोणाला बाहेर पडता येत नाही. परंतु स्वयंसेवक म्हणून काम करणारे भरतेश पाटील हे गोजग्याहून येऊन सायकलवरून महिलांना पिशव्या शिवण्यासाठी कपडे पोहोचवतात, किट वितरण करतात. व सर्व तऱहेच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदीला जाताना प्रत्येकाने आपल्या सोबत पिशव्या घेऊन जाव्यात यासाठी प्रयासचा प्रयत्न आहे.
विचार सरणी बदलणे गरजेचे :आरती भंडारे

प्रत्येकजण पर्यावरण वाचविले पाहिजे असे म्हणतो. पण प्रत्यक्षात फार कमी लोक त्यासाठी कृतिशील काम करतात. कॅरी युवर बॅग असे आवाहन मी कित्येक वर्षे करत आहे. प्लास्टिक पिशव्यांचे किट पाहून ‘पर्यावरण की बॅण्ड बज गई’ असे म्हणणे सोपे होते. परंतु ही टीका मी सकारात्मकपणे घेतली. आणि त्यातूनच ‘पिशवी’चा उगम झाला. मॉलमध्ये दिल्या जाणाऱया पिशवीसाठी आपण पैसे मोजतो. परंतु तशीच पिशवी भाजी विपेत्यांनी दिली तर ती फुकट द्यावी, अशी आपली अपेक्षा असते. यापुढे आम्ही भाजी विपेत्यांकडे या पिशव्या देणार आहोत. जेणेकरून प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल. त्यासाठी लोकांनी न फाटलेले सुस्थितीतील जुने पडदे, बेडसिट्स जरूर द्यावेत. पाणी वाचविणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे हे प्रत्येकाला सहज शक्मय आहे. फक्त त्यासाठी आपली विचार सरणी बदलणे गरजेचे आहे.
पर्यावरण रक्षण करण्यास खारीचा वाटा : भरतेश पाटील

मी क्रीडा प्रशिक्षक आहे. परंतु मला वेगवेगळय़ा पद्धतीचे सामाजिक काम करण्यास आवडते. अमूल्य बूंद आणि आरती भंडारे यांच्या कामाची माहिती असल्याने मी या संस्थेशी जोडलो गेलो आहे. पर्यावरण रक्षण करण्यास आपला अगदी छोटा असा खारीचा वाटा आहे. याचे मला समाधान आहे.
अनेक गरजू महिलांना मिळाले काम : सुमा जैन

अमृता आणि आरती यांच्या सांगण्यानुसार महिलांचा मी शोध घेतला. आणि अनेक गरजू महिलांना काम देता आले. हा उपक्रम निरंतर सुरू रहावा अशीच माझी अपेक्षा आहे.









