वार्ताहर / उसगांव
लॉकडाऊनच्या काळात फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळातील बाह्य़रुग्ण सेवा व इतर बहुतेक सेवा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी पिळये तिस्क येथील आरोग्य केंद्र जनतेसाठी खुली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने बऱयाच लोकांना या इस्पितळात येणे गैरसोयीचे असले तरी येथील ओपीडीमध्ये दिवसाकाठी किमान दिडशे रुग्ण तपासणीसाठी येतात.
येथील कॅज्युलेटी म्हणजे अत्यावश्यक सेवेबरोबरच बाह्य़रुग्ण सेवा रुग्णांसाठी खुली असून बालरोग तज्ञ, दंतचिकित्सा तज्ञ, नेत्र तज्ञ व सर्वसामान्य तपासण्या करणारा डॉक्टर मिळून एकूण पाच डॉक्टर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे उसगांव बरोबरच पाळी ते मोले पर्यंतच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या काळात बऱयाच डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवल्याने या आरोग्य केंद्रामुळे जनतेची गैरसोय दूर झाली आहे.









