प्रतिनिधी /फोंडा
पिळयें-धारबांदोडा येथील श्री भूमिका देवीचे मंदिर फोडून चोरट्यांनी पाच समया व सीसीटीव्ही कॅमेराच्या मॉनिटरसह साधारण ऊ. 30 हजारांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे सोमवारी रात्री किंवा पहाटेच्यावेळी ही चोरी झाली असावी. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी आंतमध्ये प्रवेश केला.
श्री भूमिका मंदिर हे लोकवस्तीपासून साधारण दीड किलोमिटर अंतरावर आहे. सध्या मंदिराच्या आवारात काम सुऊ असल्याने प्रवेश मार्गावरील मुख्य लोखंडी गेट कामगारांच्या सोयीसाठी खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे चोरट्यांना वाहन घेऊन थेट मंदिरापर्यंत येता आले. मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी आंतमध्ये प्रवेश केला व फंडपेटी आणि कपाटे उघडली. आठ दिवसांपूर्वी देवस्थानचा कालोत्सव झाल्याने देवस्थान समितीने फंडपेटीत जमा झालेली रोख रक्कम हिशेबात जमा केली होती. त्यामुळे चोरट्यांचा मुख्य बेत फसला. मात्र त्यांनी मंदिरातील 5 मोठ्या समया, पराती व पुजेचे साहित्य पळविले. तसेच मंदिरातील सीसीटीव्हीचा एक मॉनिटरही लंपास केला. चोरीला गेलेला एकूण ऐवज ऊ. 30 हजारांचा असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष निळू गावस यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तपासकार्यात श्वानपथक व ठसेतज्ञांची मदत घेण्यात आली. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास सुऊ आहे.









