पंच कमिटीच्या बैठकीत घेतला निर्णय, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन : अत्यंत अडचण असल्यासच मुभा मिळणार
वार्ताहर / किणये
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. पिरनवाडी परिसरात सर्दी, ताप, खोकला अशा किरकोळ आजारांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून व आपल्या गावातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पिरनवाडी गावात बुधवार दि. 2 रोजीपासून रविवार दि. 6 पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पाच दिवसात गावातील सर्व व्यवहार व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ औषध दुकाने व दवाखाने यांना मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पंच कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रविवारी ग्राम पंचायतीच्या कार्यालयात गावातील काही प्रमुख पंचांनी बैठक घेऊन हा ठराव केला आहे. बैठकीमध्ये सर्व पंचांनी मास्कचा वापर केला होता. तसेच सॅनिटायझर देण्यात आले व सामाजिक अंतर ठेवूनच बैठक पार पडली.
पिरनवाडी गावात बुधवारपासून शुक्रवारपर्यंत असे तीन दिवस लॉकडाऊन करण्याचे ठरविले आहे. तर शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यू असल्यामुळे पाच दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या पाच दिवसात संपूर्ण भाजी व फळविपेते, किराणा दुकानदार व इतर सर्व दुकाने बंद ठेवायची आहेत. याशिवाय गवंडी व सेंट्रिंग कामानिमित्त कोणीही बाहेर जाऊ नये व बाहेरच्या व्यक्तींना गावात बोलावू नये, असे ठरविले आहे. पिरनवाडीतील बरेच नागरिक उद्यमबाग व मच्छे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये कामाला जातात. या कामगारांनाही पाच दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
गावच्यावतीने बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस कारखान्यातील कामगार कामाला येऊ शकणार नाहीत. यासाठी त्यांच्या मालकांनी पिरनवाडीतील कामगारांना सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे. तर शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यू आहेच.
पिरनवाडी गावच्या हद्दीत कोणीही विनाकारण फिरू नये. तसेच पाटर्य़ा व सांघिक खेळ उदा. गोटय़ा, क्रिकेट, कबड्डी यावरही पाच दिवसांचे बंधन लागू करण्यात आले आहे. गावातील सर्व समाजातील प्रार्थनास्थळे बंद ठेवून सहकार्य करावे, असेही ठरविण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिरनवाडीत हा निर्णय घेण्यात आला असून गावातील नागरिकांना कोणत्याही आजाराबद्दलच्या रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी आशा कार्यकर्त्या व सरकारी इस्पितळ किंवा खासगी दवाखान्यामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
एरवी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात पिरनवाडीत सकाळी 10 पर्यंत भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. पिरनवाडीसह अनेक आजूबाजूच्या गावातील नागरिकांसाठी पिरनवाडी ही मुख्य बाजारपेठ ठरते. तर येणारे पाच दिवस आजूबाजूच्या नागरिकांनीही पिरनवाडीत येणे टाळावे, असेही ठरविले आहे. या पाच दिवसांमध्ये कोणालाही अगदीच अडचणीचे काम भासल्यास त्यांनी आपापल्या समाजातील प्रमुख पंचांशी संपर्क साधावा, असेही ठरविले आहे.
नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी पंच कमिटीच्यावतीने स्वयंस्फूर्तीने हा निर्णय घेण्यात आला असून याला सर्व स्तरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला शिवाजी शहापूरकर, श्रीकांत पाटील, महावीर पाटील, ए. ए. भोईटे, यल्लाप्पा शिंदे, पिराजी शिंदे, मल्लाप्पा पाटील, प्रमोद मुचंडीकर, मल्लाप्पा उचगावकर, अन्सार हुबळीवाले, मजहर मुल्ला, इलियास अहमद मुजावर, विजयानंद नेसरकर, सतीश राऊत, अन्सार मजुकर, अल्ताफ मुजावर, प्रदीप गडदर, जोतिबा लोहार, किरण नेसरकर आदी उपस्थित होते.









