ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण स्वदेशी बनावटीची पिनाका गाइडेड रॉकेट लाँचर प्रणाली आता नवीन अवतारासह शत्रूचा सामना करण्यास सज्ज आहे. चीन आणि पाकिस्तानबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डीआरडीओने शनिवारी पोखरण येथे पिनाकाची सुधारित आवृत्ती असलेल्या पिनाका-ईआरची यशस्वी चाचणी पूर्ण केली.
संरक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा विचार करुन पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरची सुधारीत आवृत्ती डीआरडीओने पुण्यातील ऑर्डनन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने तयार केली आहे. हे तंत्रज्ञान भारतीय उद्योग क्षेत्रातही हस्तांतरित करण्यात आले आहे. पिनाका ही पिनाकाची प्रगत आवृत्ती आहे, जी गेल्या दशकभरापासून सैन्यात कार्यरत आहे. लवकरच तोफदळ विभागात पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरची सुधारीत आवृत्ती पण कार्यरत होईल. नवीन तंत्रज्ञानासह उदयोन्मुख गरजा लक्षात घेऊन ही प्रणाली डिझाइन केली गेली आहे.
44 सेकंदात 12 रॉकेट डागण्याची पिनाका ही पहिली क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रणाली होती. त्यात 38 किमीपर्यंत मारक क्षमता होती, पण अपग्रेड झाल्यानंतर 44 सेकंदात 72 रॉकेट डागता येतात. तसेच 75 किलोमीटर अंतरअचूक लक्ष्य करण्यास सक्षम आहे. शत्रूची वाहने, बंकर, नियंत्रण कक्ष, शस्त्रांचे गोदाम यांना लक्ष्य करण्यासाठी पिनाका रॉकेट वापरली जातात. संगणकीकृत यंत्रणा लक्ष्य निश्चित करुन ते नष्ट करण्यासाठी रॉकेट प्रक्षेपित करते.