प्रतिनिधी/बागणी
काकाचीवाडी येथील विकास सोसायटीचे संस्थापक चेअरमन शिवाजी ढोले व त्यांचा मुलगा पियुष ढोले यांच्या अपहरण व ५० लाख रुपयांची खंडणी प्रकारच्या निषेधार्थ काकाचीवाडी कडकडीत बंद करण्यात आली होती तर बागणी मध्ये बंदला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी बंद पाळला.
काकाचीवाडी येथील शिवाजी ढोले व मुलगा पियुष ढोले यांचे गावातीलच युवकांनी ५० लाखांच्या खंडणी साठी अपहरण करून मागणी केली होती. या घटनेच्या निषेधार्थ काकाचीवाडी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला तर बागणी येथे देखील चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कडकडीत बंद पाळत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
गावच्या इतिहासातील व तालुक्यातील पहिलीच अशी घटना घडली असून यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर अनेक जाणकार व जेष्ठांनी तीव्र शब्दात झालेला प्रकार चुकीचा झाला आहे असे मत व्यक्त केले. सध्या वारणा काढावर युवकांची अशी अनेक प्रकरणे घडत असल्याने क्रांतिकारकांचा वारसा असणारा तालुका आता पुन्हा गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला अन्याया विरुद्ध लढणारे बापू बिरु वाटेगावकर यांचा उल्लेख केला जातो तर एका बाजूला ज्यांनी समाजाला एक आदर्शवत अशी विचारधारा दिली असे कै. लोकनेते राजारामबापू पाटील, कै. नागनाथ आण्णा नायकवडी, क्रांतिसिंह नाना पाटील, कै. सरोजिनी बाबर, वी. स. पागे, रमजान शाहीर, कै. विलासराव शिंदे अशा कित्तेक विचारवंत लोकांची विचारधारा असणारी भूमी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा भूमीत युवकांची विचारधारा कोठे चालली आहे याची आता चिंता आता समाजातील जाणकार लोक करत आहेत.
किरकोळ मारामारी असो किंवा गावात गांजा तस्करी असो अशा दोन नंबर धंद्यांनी देखील डोके वर काढले आहे. त्यामुळे युवकांची मानसिकता आता कष्ट करण्याची राहिली नाही. जलद श्रीमंत होण्याच्या नादात आता युवक कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. घडलेल्या घटनेच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. अशा घटनेची पाळेमुळे खणून काढली तर उद्या दहशत माजवण्याऱ्या युवकांकर कायद्याचा धाक राहील. अपहरण करण्यासाठी या युवकांनी आर्थिक रसद कोणी दिली का? यामध्ये राजकीय हेतू आहे का ? असा संशय व्यक्त केला जात आहे.