हिंदवाडीतील रहिवाशांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार : कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
रहिवासी वसाहतीमध्ये औद्योगिक व्यवसाय करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र शासनाचे सर्व निर्बंध झुगारून आनंदवाडी शहापूरसारख्या भर वस्तीमध्ये पितळ वितळविण्याचा कारखाना चालविण्यात येत आहे. यामुळे वायू व ध्वनी प्रदूषण होत असून, रहिवाशांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कारखान्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
आनंदवाडी येथील घर नं. 349 या ठिकाणी सुरेश ढवळे यांनी पितळ वितळविण्याचा कारखाना थाटला आहे. या ठिकाणी दररोज 30 किलो पितळ वितळविण्यासाठी 25 किलो कोळसा जाळला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण तसेच जोराचा आवाज होत असल्याने ध्वनिप्रदूषण होत आहे. पितळ वितळविण्याच्या प्रक्रियेमुळे विविध विषारी वायू हवेत मिसळत असल्याने रहिवाशांना याचा त्रास होत आहे. पितळ वितळविण्याच्या कारखान्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. येथील ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे विष्णू ढवळे हे कर्करोगाचे शिकार झाल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. वायू व ध्वनी प्रदूषणाच्या नियमावलीचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे भरवस्तीत असलेल्या या कारखान्यावर आवश्यक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आले. विष्णू ढवळे व त्यांच्या कुटुंबीयांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले.









