मडगाव : सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल काल खेळविण्यात आलेला जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील लढत 1-1 अशी अनिर्णीत अवस्थेत संपली. वास्कोतील टिळक मैदानावर काल हा सामना खेळविण्यात आला. या बरोबरीने उभय संघाना प्रत्येकी एक गुण मिळाला. हैदराबाद एफसीचे आता तीन सामन्यांतून एक विजय आणि दोन बरोबरीने 5 तर जमशेदपूरचे 3 सामन्यांतून 2 गुण झाले आहेत.
हैदराबाद एफसीने सामन्याचे पहिले सत्र आपल्या आक्रमक सांघिक खेळीने गाजविले. मात्र सामन्यातील पहिली आणि त्यांची एकमेव धोकादायक चाल तिसऱयाच मिनिटाला जमशेदपूर एफसीने केली. यावेळी पीटर हार्टलीने दिलेल्या पासवर जॅकीचंद सिंगचा फटका वाया गेला.
त्यानंतरच्या खेळावर निर्विवादपणे हैदराबाद एफसीचे वर्चस्व आढळून आले. हालीचरण नर्झारी आणि लिस्टन कुलासोने काल चांगला खेळ केला. प्रथम हालीचरणच्या पासवर लिस्टन कुलासोचा गोल करण्याचा यत्न हुकला. त्यानंतर 16व्या मिनिटाला लिस्टन कुलासो आणि आशिष रायने रचलेल्या चालीवर हालीचरण नर्झारीचा फटका जमशेदपूरचा गोलरक्षक पवनकुमारने पंच करून बाहेर टाकला.
पहिल्या सत्रातील शेवटच्या पंधरा मिनिटात हैदराबाद एफसीने कित्येक आक्रमणे जमशेदपूरवर केली होती.
मात्र गोल नोंदविण्यात त्यांचे स्टायकर्स कमनशिबी ठरले. प्रथम 37व्या मिनिटाला आशिष रायच्या पासवर मोहम्मद यासीरचा गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला तर 41व्या मिनिटाला हालीचरण नर्झारीचा फटका गोलच्या उजव्या पट्टीला आदळून बाहेर गेला. यावेळी आरिदाने सांतानाने दिलेल्या पासवर हालीचरण नर्झारीने बचावपटू लालदिनलियाना रेंथलीला भेदले आणि नंतर गोलरक्षक पवनकुमारलाही चकविले होते.
दुसऱया सत्रात दोन्ही संघांचे समान वर्चस्व सामन्यावर आढळून आले. सामना संपण्यास पाच मिनिटांचा अवधी असताना स्टिफन इझेने 30 यार्डवरून हाणलेला फटका कधी गोलात जाऊन विसावला, हे हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीला समजले देखील नाही. शेवटच्या मिनिटाला जमशेदपूरच्या पीटर हार्टलीची गोल करण्याची संधी हुकल्याने त्यांचा विजय हुकला.









