क्रीडा प्रतिनिधी /मडगांव
दोन गोलांच्या पिछाडीनंतर एफसी गोवाने आक्रमक आणि सांघिक खेळाचे दर्शन घडवित केरळ ब्लास्टर्स संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले. आयएसएलमधील काल हा रोमहर्षक सामना वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आला.
पहिल्याच सत्रातच उभय संघांकडून चार गोलांची नोंद झाली. केरळ ब्लास्टर्ससाठी जिक्सन सिंग आणि ऍड्रियान लूना यांनी तर एफसी गोवासाठी जॉर्गे ऑर्तिज आणि कप्तान एदू बेडियाने गोल केले. या निकालाने दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. केरळ ब्लास्टर्सचे आता 9 सामन्यांतून तीन विजय, पाच बरोबरी आणि एका पराभवाने 14 गुण झाले. एफसी गोवाचा हा 9 सामन्यांतील तिसरा ड्रॉ. त्यांचे आता दोन विजय, तीन बरोबरी आणि चार पराभवांनी 9 गुण झाले आहेत.
या सामन्याची सुरूवात धडाक्यात करताना केरळ ब्लास्टर्सने 20 मिनिटांतच दोन गोल केले. प्रतिस्पर्धी संघांच्या सेट-पीसवर एफसी गोव्याची बचावफळी परत एकदा अपयशी ठरल्याचे दिसून आले. आतापर्यंत एफसी गोवाने या पद्धतीने दहा गोल घेतले आहेत. सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने गोल करून आघाडी घेतली. यावेळी ऍड्रियान लूनाने घेतलेल्या कॉर्नरवर जिक्सन सिंगने आपल्या जबरदस्त हेडरवर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगला भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला. या गोलवर एफसी गोवाच्या बचावफळीतील मर्यादा पार उघडय़ा पडल्या.
या गोलनंतर केरळ ब्लास्टर्सने आपल्या खेळातील आक्रमकता वाढविली आणि 24व्या मिनिटाला एफसी गोवावर दुसरा गोल लादला. स्पर्धेतील आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट गोल ठरवा असा हा गोल ऍड्रियान लूनाने किमान 40 यार्डवरून हाणून केला. परेरा दियाजने दिलेल्या पासवर ऍड्रियानने मारलेला फटका गोलच्या उजव्या पोस्टाला आदळला आणि सरळ गोलात गेला.
दोन गोलांच्या पिछाडीनंतर एफसी गोवाने आपली खेळातील आक्रमकता वाढविली आणि उत्कृष्ट सांघिक खेळ केला व दोन्ही गोल बाद केले. प्रथम 24व्या मिनिटाला सावियर गामा याने डाव्या बगलेतून केलेल्या चालीवर कालच्या लढतीत सामनावीर ठरलेल्या जॉर्गे ऑर्तिजने एका आकर्षक फटक्यावर केरळ ब्लास्टर्सचा गोलरक्षक प्रभसूखन सिंगला चेंडू अडविण्याची कोणतीही संधी दिली नाही.
एफसी गोवाने आपला बरोबरी साधणारा गोल लढतीच्या 38व्या मिनिटाला केला. कप्तान एदू बेडियाने केलेला हा गोल सुद्धा प्रेक्षणीय होता. केरळ ब्लास्टर्सच्या उजव्या बाजूने मारलेला कॉर्नर सरळ गोलात केल्याने एफसी गोवाचा बरोबरी साधणारा गोल केला. दुसऱया सत्रात दोन्ही संघांनी चांगली आक्रमणे केली. मात्र दोन्ही संघाच्या बचावफळीने चांगला बचाव केल्याने सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.









