प्रतिनिधी/ सातारा
चालू ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार जिह्यातील 1 हजार 420 हेक्टरचे नुकसान झाले आहे तरी संबंधित विभागांनी तत्काळ पंचनामे करुन तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना गुरुवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. दरम्यान, बुधवारी रात्रभर पावसाने प्रचंड कहर केला. मात्र, गुरुवारी पहाटेपासून दिवसभरात उसंत दिली होती.
या पावसाने जिल्हय़ातील शेतकऱयांचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा तालुक्यातील अंबवडे बु. या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकाची पहाणी केली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी उपस्थित होते.
सातारा तालुक्यातील भात, सोयाबीन व भुईमुग 60 हेक्टर, कोरेगाव तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला व आले 120 हेक्टर, खटाव तालुक्यातील बटाटा, कांदा 70 हेक्टर, कराड भात, ज्वारी 20 हेक्टर, पाटण तालुक्यातील भात 200 हेक्टर, खंडाळा तालुक्यातील भाजीपाला 5 हेक्टर, वाई तालुक्यातील भात, सोयाबीन व भाजीपाला 15 हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यातील भात 30 हेक्टर, फलटण तालुक्यातील भाजीपाला, मका व ज्वारी 390 हेक्टर, माण तालुक्यातील ज्वारी व मका 510 हेक्टर असे एकूण 1 हजार 240 क्षेत्रावरील वरील पिकांचे नुसान कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार नुकसान झाले आहे.
जिह्यातील महत्वाच्या धरणांमधून सध्या विसर्ग सुरु आहे. पाऊसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. हवामान खात्याने पुढील काही दिवसात बहुतेक ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी अतिवृष्टीच्या कालावधीत जिह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
जोर ओसरला, पूरस्थितीमुळे अनेकांना फटका
सातारा शहरासह जिल्हय़ात बुधवारी दिवसभर व रात्रभर पावसाने अक्षरशः थैमान घातले. संततधार पावसाने सारे जनजीवन कोलमडून गेले होते. एकीकडे कोरोनातून थोडासा दिलासा मिळत असताना परतीचे पावसाने मात्र सर्वांचेच कंबरडे मोडले. यामध्ये शेतकऱयांना मोठा फटका बसला असून जिल्हय़ात बहुतांशी ठिकाणी सोयाबीन, भात, ऊस आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीच्या इशाऱयामुळे धोम, कण्हेर, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले होते. तर काही ठिकाणी वस्तीमध्ये पाणी शिरले होते. गुरुवारी सकाळी जिल्हय़ात दिवसभर अधूनमधून सरी येत होत्या. पण बुधवारच्या तुलनेत खूपच कमी पाऊस होता त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला.
जिल्हाधिकाऱयांचे तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश
ऑक्टोंबर 2020 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे. शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱयांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ, ब, क, क, ड मध्ये अहवाल सादर करावा. येणाऱया प्रस्तावामध्ये एकाच लाभार्थ्यांसाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱयांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा असल्याने अहवाल तत्काळ सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.








