प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील वाढे फाटा येथे मधुकर बाबुराव पवार या 75 वर्षीय वृद्धाने पिकअप गाडीच्या पाठीमागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घराशेजारी लावलेल्या पीकअप गाडीत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मानसिक ताण-तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पवार रात्री साडेबारा नंतर घरातून निघून गेले होते. सकाळी नातेवाईकांनी शोधाशोध केली असता घराच्या शेजारी उभ्या असलेल्या पिकअप गाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गाडीत लटकलेला मृतदेह पोलिसानी स्थानिकांच्या मदतीने खाली उतरवून पंचनामा केला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिसात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.