चिपळूण
पिंपळी येथील पॅनॉलमध्ये पोहायला गेलेल्या तिघां तरुणांपैकी एकजण बुडाला असल्याची घटना शुक्रवारी घडली. या तिघांपैकी दोघेजण सुदैवाने बचावले. बुडालेल्या तरुणाचा शोध शनिवारी सुरुच होता.
पिंपळी बुद्रूक येथील 10 ते 12 तरुण शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता कॅनॉलमध्ये पोहायला गेले होते. जवळपास 20 ते 22 वर्षांचे असणारे हे तरुण पोहून कनॉलबाहेर पडत असतानाच पाण्याचा एक मोठा प्रवाह आला. यात प्रविण प्रकाश सावंत, पारस अनिल सावंत व दीपक तुलसीराम मोहिते हे तिघेजण बुडू लागले. त्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते पाण्यातून बाहेर येण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यात पारस सावंत यांनी झाडाची वेल पकडली, तर दीपक मोहिते यांनी कॅनालच्या संरक्षक भिंतीचा आधार घेत कसेबसे सुरक्षित झाले. त्यांना बाकीच्या तरुणांनी हात देऊन पाण्याबाहेर काढल्याने सुदैवाने या दोघांना वाचवण्यात यश आले.
मात्र प्रवीण सावंत हा बुडाला. त्यामुळे त्याला वाचवण्यात यश आले नाही. याबाबतची माहिती परिसरात समजताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची माहिती शिरगाव पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे घटनास्थळी दाखल झाले. शनिवारीदेखील बुडालेल्या तरुणाचा शोध सुरु होता.









