पिंपळगाव / वार्ताहर
पिंपळगाव (ता.भुदरगड)येथील माऊली गिफ्ट शॉपिच्या दुकानास शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेल्या आगीत सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीमुळे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात आले.
येथील एस. टी. स्टँडवर असलेल्या चव्हाण कॉप्लेक्समध्ये भुजंग पावले यांचे माऊली गिफ्ट शॉपी हे गिफ्ट, खेळणी व वह्या-पुस्तकांचे दुकान आहे. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रस्त्याने चालत फिरावयास जाणाऱ्या काही महिलांना दुकानांतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे लक्षात आले. त्या महिलांनी तात्काळ शेजारीच राहावयास असलेल्या कॉप्लेक्सचे मालक सदाशिव चव्हाण यांना उठविले. त्यांनी तात्काळ दुकान मालक भुजंग पावले यांना बोलावून घेऊन दुकानाचे कुलूप काढले असता दुकानात आतमध्ये मोठ्या प्रमाणात आग भडकली असल्याचे लक्षात दिसून आले.
यावेळी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. यावेळी दुकानातील सर्व फर्निचर ,गिफ्ट्स , खेळणी , वह्या-पुस्तके असे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. मोठ्या प्रमाणात असलेली सर्व प्लास्टिकची खेळणी पुर्णतः वितळून गेली होती. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे सांगण्यात आले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला आहे. भुजंग पावले यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून या दुकानातील व्यवसायातुन त्यांचे कुटुंब चालले होते. यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून व्यापारी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदत करणेचे ठरविले आहे. तरी त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन पिंपळगाव व्यापारी संघटनेने केले आहे.