ऑनलाईन टीम / पिंपरी :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यापार्श्वभुमीवर पिंपरी महापालिकेने थकबाकीदार नागरिकांना अवैध बांधकामांचा शास्तीकर (दंड) वगळून मूळ कर भरण्याची मुभा दिली आहे. जे मालमत्ताधारक थकबाकीसह संपूर्ण मिळकत कराची एक रक्कमी 100 टक्के रक्कम भरतील. त्यांना महापालिका दंड रकमेत 90 टक्के सवलत देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मूळकराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
दरम्यान, भविष्यात अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ झाल्यास भरलेल्या दंडाची रक्कम मूळ करामध्ये समायोजन करण्यात येईल. त्याची पोहोच पावती नागरिकांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जे मालमत्ताधारक थकबाकीसह अवैध बांधकाम शास्तीकराची रक्कम वगळून संपूर्ण मिळकत कराचा एक रक्कमी 100 टक्के भरणा करतील. त्यांना महापालिकेतर्फे आकारण्यात आलेल्या विलंब दंडाच्या रकमेत 90 टक्के सवलत दिली जाईल. या अभय योजनेस 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांना 2 जूनपासून महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयामध्ये रोख, धनादेश, डीडीद्वारे मालमत्ताकराचा भरणा करता येईल. तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.goc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी 30 जूनपूर्वी एक रक्कमी मिळकत कराचा भरणा करुन सामान्य करातील विविध सवलत योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.








