प्रतिनिधी / वास्को
मुरगावचे नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांच्या निधनामुळे वास्कोत कोरोनाचे गांभिर्य अधिकच वाढले असून लोकांमधील भितीमध्ये आणखी भर पडली आहे. पास्कॉल हे माजी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोजा यांचे बंधू होते. मुरगावचे अजून तीन नगरसेवक आणि दोन अधिकारी कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मुरगावच्या नगराध्यक्षांसह एका नगरसेविकेला दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून मुक्त करण्यात आले आहे.
नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांना मागच्या रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्या 72 वर्षे वयाचा आणि तब्येतीचा विचार करून त्यांना थेट मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागचे आठ दिवस ते तिथे उपचार घेत होते. मात्र, प्रकृती खालावत जाऊन अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर त्यांचे निधन झाले.
तीस वर्षांपासून सार्वजनिक जीवनात कार्यरत
पास्कॉल यांच्या निधनाची वार्ता सकाळी वास्कोत पसरली व खारवीवाडा, वास्को शहर व मांगोरहिल भागात हळहळ पसरली. कनिष्ठ बंधू माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोजा यांच्या खांदय़ाला खांदा लावून मागच्या तीस वर्षांपासून ते वास्कोतील सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यामुळे संपूर्ण मुरगाव तालुक्यातील लोकांना ते परिचित होते. मुरगाव पालिका क्षेत्रातील मांगोरहिलच्या प्रभागातून सतत दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवक म्हणून सक्रीय होते.
कंटेनमेंटमधील लोकांच्या त्रासांकडे वेधले होते लक्ष
मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनला दिलेल्या भेटीवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तेथील लोकांच्या समस्या मांडून त्या सोडवण्याची मागणी केली होती. पंधरा दिवसांपूर्वी पालिका मंडळाच्या बैठकीतही त्यांनी पुन्हा मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनमधील लोकांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याची विनंती केली होती.
पास्कॉल यांच्या निधनामुळे वास्कोत कोरोनाच्या भितीत अधिकच वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका पाठोपाठ दोघांचे निधन खारवीवाडा भागात कोरोनामुळे झाले. त्यानंतर मूळ खारवीवाडावासीय असलेल्या पास्कॉल यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित आणि दोन अविवाहित कन्याही आहेत.
रविवारी संध्याकाळी वास्कोतील सेंट ऍड्रय़ू चर्चच्या दफनभूमीत बंधू जुझे फिलीप डिसोजा यांच्यासह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पॉस्कॉल यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. काही नगरसेवक तसेच जवळचे काही लोक अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिले. मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनमधील लोकांनी एकत्र येऊन रविवारी संध्याकाळी मेणबत्ती प्रज्वलीत करून नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांना श्रध्दांजली वाहिली. मुरगावचे नगरसेवक व संपूर्ण पालिका मंडळाने त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.









