चिराग पासवान सध्या वडिलांच्या वैद्यकीय सेवेत : आयसीयूमध्ये उपचार : प्रचाराकडे पाठ
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण तापलेले असतानाच लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आपल्या पक्षनेत्यांना व कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पक्षाचे संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) दाखल असल्याची माहिती दिली आहे.
रामविलास पासवान हे सध्या इस्पितळामध्ये उपचार घेत असल्याने चिराग पासवान सध्या त्यांच्या सेवेत गुंतलेले आहेत. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना सोडून राजकीय प्रचारात सहभागी होण्याकडे त्यांनी सध्या पाठ फिरवली आहे. आपल्या या कृतीबाबत कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठी त्यांनी पत्राचा आधार घेतला आहे. या पत्रातून वडिलांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमात आली असतानाच सध्या मी वडिलांना रोज आजाराशी लढताना पाहत आहे. एक मुलगा या नात्याने वडिलांना रुग्णालयात पाहून अतिशय अस्वस्थ वाटत आहे, असा उल्लेख चिराग पासवान यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक जवळ आलेली असूनही पाटणा येथे जाण्यास असमर्थ असल्याचे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले. “वडिलांनी मला अनेकदा पाटणा येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र मुलगा या नात्याने वडिलांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे माझ्यासाठी शक्मय नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मला त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. नाहीतर तुमचा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला माफ करू शकणार नाही.’’ असे चिराग पासवान म्हणाले. पासवान पिता-पुत्र सध्या इस्पितळात असल्यामुळे उमेदवारी वाटप, प्रचार आणि बैठका गतीने होताना दिसत नाही. बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसात होणार आहे.