परदेशवारी करणाऱयांचा मार्ग मोकळा : दररोज 35 ते 40 नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन महिने बंद असलेली बेळगावमधील पोस्ट-पासपोर्ट सेवाकेंद्रे अखेर सोमवारपासून पुन्हा कार्यरत झाली. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्यातील पासपोर्ट केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. रुग्णांची संख्या आता कमी झाल्याने पुन्हा पासपोर्ट सेवाकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे शिक्षण, व्यवसायासाठी परदेशवारीच्या तयारीत असणाऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्हय़ात दोन पोस्ट पासपोर्ट सेवाकेंदे आहेत. शहरातील कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात व चिकोडी येथे दुसरे पासपोर्ट कार्यालय आहे. पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने ही दोन्हीही सेवाकेंदे सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून ही कार्यालये बंद करण्यात आली होती. यामुळे ज्यांनी अपॉईंटमेंट घेतली होती त्यांना मात्र फटका बसला. त्यामुळे पासपोर्ट सेवाकेंद्रे पुन्हा केव्हा सुरू होणार, याची आतुरता नागरिकांना होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवार दि. 28 जूनपासून राज्यातील सर्व पासपोर्ट सेवाकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सोमवारपासून सेवाकेंद सुरू असले तरी मंगळवारपासून नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. दररोज 35 ते 40 नागरिकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अपॉईंटमेंट दिली जात आहे. यामुळे ज्यांना परदेशवारी करायची आहे, त्यांना पासपोर्ट काढणे सोयीचे होणार आहे.









