आजच्या बैठकीत विविध विषयांवर होणार चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांना पाच वर्षांतून एकदा गमबूट व रेनकोट वितरित करण्यात येतात. रेनकोट खरेदीचा निर्णय 25 जून रोजी घेण्यात आला होता. मात्र हे साहित्य खरेदी करण्यासाठी ऑगस्ट उजाडला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत पावसाळी साहित्य खरेदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर हे साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे कामगारांना पावसाळा संपल्यानंतर रेनकोट व गमबूट मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक बुधवार दि. 25 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विविध कामकाजासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांची बदली झाली असल्याने ही बैठक शेवटची असणार आहे.
या बैठकीत रेनकोट व गमबूट खरेदी निविदा मंजुरीचा विषय अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. कर्मचाऱयांना पावसाळय़ात काम करावे लागते. त्यामुळे कॅन्टोन्मेंटकडून दर पाच वर्षांतून एकदा रेनकोट व गमबूट दिले जातात. यंदा रेनकोट वितरणासाठी 76 पुरुष आणि गमबूटकरिता 70 पुरुष तसेच रेनकोटकरिता 27 महिला पात्र आहेत. सदर रेनकोट व गमबूट खरेदीचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला होता. दि. 25 जून रोजी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करून निविदा मागविण्यात आल्या होत्या. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा मंजुरीसाठी हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर पावसाळी साहित्य खरेदीसाठी मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर कामगारांना पावसाळी साहित्य देण्यात येणार आहे. त्यामुळे हे साहित्य पावसाळा संपल्यानंतर मिळण्याची शक्मयता आहे. वास्तविक पाहता पावसाळय़ापूर्वी साहित्य कामगारांना देणे आवश्यक होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून अनधिकृत बांधकाम, प्रलंबित विकासकामांना मंजुरी देणे, तसेच नवीन कामांसाठी निविदा काढणे आणि पार्किंग शुल्क वसुलीच्या कंत्राटाला मंजुरी देणे, असे विविध विषय अजेंडय़ावर घेण्यात आले आहेत.









