शेतकऱयांना आर्थिक चिंता
धामणे/ वार्ताहर
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर गेल्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. भात, बटाटा, भुईमूग या पिकांना हा पाऊस पोषक असून धामणे, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, देसूर, सुळगा (येळ्ळूर), मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
यंदा पावसाळय़ाच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाने पिकांना काही प्रमाणात फटका बसला होता. परंतु शेतकऱयांनी या पिकांना रासायनिक खते वापरून आणि मोठय़ा पावसाने गेलेल्या भात शिवारात रोप लागवड केली. परंतु पूर्ण ऑगस्ट महिना पावसाने दडी मारली व या भागातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला. परंतु गेल्या पाच सहा दिवसात पुन्हा दमदार पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून आले.
मध्यंतरी पावसाने एक महिना दडी मारल्याने माळ शिवारातील भात पिक, बटाटे, भुईमूग ही पिके सुकण्याच्या स्थितीत होती शिवाय बटाटा व सोयाबीन पिकांचे बऱयाच प्रमाणात नुकसान झाले. ऐन वेळी पावसाने दडी मारल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करावी लागली.
धामणे भागात भात, सोयाबीन, भूईमूग पेरणी अधिक प्रमाणात असून बटाटय़ाची लागवड यंदा कमी प्रमाणात करण्यात आली आहे.
नंदिहळ्ळी, नागेनहट्टी भागात उसाची लागवड अधिक प्रमाणात आहे. यंदा येथील शेतकऱयांना दुबार भात पेरणी तसेच भात रोप लागवड देखील करावी लागली. त्यानंतर पावसाने बराच काळ दडी मारल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु मागील आठवडय़ात दमदार पावसामुळे येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
देसूर, राजहंसगड, सुगळे (ये.) येथील माळ जमिनीतील भात पीक मध्यंतरी दीर्घकाळ पावसाने दडी मारल्याने या जमिनीतील ओलावा कमी होऊन भात पिकाला फटका बसला. माळ शिवारातील भात पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे हे भात पीक सुमार अवस्थेत आहे. राजहंसगड येथील भुईमूग पीक उत्तम असून या भागात बटाटय़ाच्या लागवडीत यंदा घट झाली आहे.
पावसाळय़ाच्या सुरुवातीला सोयाबीन पेरणी काही शेतकऱयांनी लवकर तर काहींनी उशिरा केली होती. पहिली पेरणी करण्यात आलेले सोयाबीनचे पिक आता काढण्याच्या स्थितीत आहे. परंतु आता सुरू असलेल्या पावसाच्या लहरीपणामुळे नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कारण ढगाळ वातावरण आणि अधून मधून बारीक पावसाच्या सरी पडत असल्याने आता काढण्यास आलेले सोयाबीन पीक काढल्यानंतर पाऊस पडला तर हे पीक खराब होणार आहे. त्यामुळे पुन्हा येथील शेतकऱयांना मोठा फटका बसून नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याची भीती येथील शेतकऱयांकडून व्यक्त होत आहे.









