जांबोटी / वार्ताहर
जांबोटी-ओलमणी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पोसवणीला आलेल्या भात पिकांना धोका निर्माण झाल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
जांबोटी भागासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात चालू वर्षी जून महिन्यापासूनच पावसाने योग्यप्रकारे साथ दिल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांची लागवड व पेरणीला अनुकूल वातावरण निर्माण झाले. जुलै महिन्यात भात रोपांची लागवड पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर माहिन्यात झालेल्या पावसामुळे शेतवडीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे भात पिकांना पोषक वातावरणाने सर्वच प्रकारची भात पिके जोमात होती. चालू वर्षी पावसाची योग्य साथ मिळाल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता होती. परंतु गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे हातातोंडाला आलेल्या भात पिकांना धोका निर्माण झाला आहे.
सध्या भात पिके पोसवणीला आली आहेत. त्यांची फलधारणा होण्यासाठी उघडीपीची आवश्यकता आहे. मात्र ऐन पोसवणीच्या हंगामातच संततधार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी भात पिकांच्या पोटरीमध्ये शिरून पोसवलेली भाताची लोंबे काळपट पडत आहेत. भात पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भागातील शेतकरीवर्ग उघडीपीच्या प्रतीक्षेत आहे.









