मंत्री गोविंद गावडे यांची माहिती : अभियंत्यांकडून घेतला कामाचा आढावा
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा शहरातील सर्व खराब रस्त्यांचे पावसापूर्वी म्हणजेच 30 मे पर्यंत हॉटमिक्स डांबरीकरण केले जाणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश फोंडा तालुक्याचे पालकमंत्री गोविंद गावडे यांनी दिले आहेत.
फोंडा शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सकाळी फोंडा येथील कलामंदिरमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रस्ता विभाग, पाणी विभाग व मलनिस्सारण प्रकल्पाच्या अभियंत्यांची संयुक्त बैठक बोलावून त्यात रस्त्यांची सुधारणा व मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर तसेच संबंधित तिनही खांत्यांचे अभियंते व नगरसेवक उपस्थित होते. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम गेली सहा वर्षे सुरु आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. यापुढे हे काम अजून रखडणार नाही याची दक्षता घेण्याची सुचनाही मंत्री गावडे यांनी अभियंत्यांना केली. ज्या रस्त्यांच्या निविदा झालेल्या नाहीत त्यांना सरकारकडून तातडीने कामाची मान्यता मिळवून देण्याची हमीही त्यांनी अभियंत्यांना दिली. गेल्या वर्षी कोरोनामुळे या कामाला विलंब झाला मात्र या पुढे जनतेला कारणे देता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी वारखंडे, खडपाबांध, दाग या भागातील रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाल्याचे सांगितले. मलनिस्सारण प्रकल्पाच्या कंत्राटदारांची सर्व बिले सरकारने फेडलेली आहेत. त्यामुळे तातडीने काम पूर्ण करून पावसापूर्वी फोंडय़ातील सर्व रस्ते हॉटमिक्स करण्याचे आदेश त्यांनी अभियंत्यांना दिली आहे अशी माहिती दिली. पाणी पुरवठय़ासंबंधी बोलताना सध्या ओपा पाणी प्रकल्पात पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध आहे. समपातळी राखण्यासाठी बंधाऱयातील पाणी वळविले जात असून उन्हाळा लांबल्यास खाण पिठातील पाणी ओपा प्रकल्पात खेचून घेण्याची तयारीही ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
मलनिस्सारण प्रकल्प व रस्ता विभागाच्या अभियंत्यांनी परस्पर समन्वय साधल्यास हे काम लवकर पूर्ण होईल. त्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना आमदार रवी नाईक यांनी केली.
फोंडा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास फोंडय़ातील आयडी इस्पितळ कोरोना रुग्णांसाठी खाली करावे लागेल. पर्यायी सोय म्हणून आयडी इस्पितळातील सर्व सेवा कुर्टी येथील पशुसंवर्धन खात्याच्या विश्राम गृहात स्थलांतरीत करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.









