शेतकऱयांची घालमेल : आम्हाला जगू दे रे बाबा अशी आर्त हाक, भातपिकाला मोठा फटका, रब्बी पिकालाही धोका
प्रतिनिधी /बेळगाव
वर्षभर काबाडकष्ट करायचे, घरचे कुटुंब दिवसरात्र राबायचे, निसर्गाच्या रुद्रावताराला झेलत पिके घेण्याचा प्रयत्न करायचा. मात्र हातातोंडाला पिके आल्यानंतर निसर्गच ही पिके पुन्हा हिसकावून घेत आहे. गेल्या काही वर्षांतील या लहरी पावसामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. मंगळवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः साऱयांचीच दाणादाण उडविली आहे. बळीराजाने कापून ठेवलेले भातपीक पाण्यावर पोहोताना दिसत आहे. हे पाहून शेतकऱयांच्या डोळय़ातून पाणी वाहू लागले आहे. ‘पुरे कर रे बाबा, आम्हाला थोडे तरी जगू दे’, अशी आर्त हाक शेतकरी मारत आहेत.
यावषी मान्सूनने दमदार हजेरी लावून शेतकऱयांना सुखद धक्का दिला होता. त्यावेळीही काही ठिकाणी पूर आला. त्यामुळे शेतकऱयांची पिके कुजून गेली होती. पुन्हा दुबारपेरणी शेतकऱयांनी केली होती. त्यानंतर कोळपणी, भांगलण ही कामे करून भातपीक जोमात आले होते. मध्यंतरी रोगाचा प्रादुर्भाव झाला. मात्र औषधाची फवारणी केली होती. सध्या भातपीक तसेच इतर पिके जोमात होती. तालुक्मयातील काही भागामधील शेतकऱयांनी भातकापणी करून मळणीच्या कामाला सुरुवात केली होती तर काही भागामध्ये भातकापणी सुरू आहे. असे असताना अवकाळी पावसाने अचानकपणे मंगळवारी रात्री ढगफुटीचा अनुभव दिला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.
रात्री पडलेल्या पावसामुळे शेतकऱयांची झोपच उडाली. तणावाखालीच सकाळी हातामध्ये कुदळ तसेच इतर अवजारे घेऊन पाणी काढण्यासाठी पहाटेच शेतकरी शेतात गेले होते. मात्र पाणी काढण्याचा मार्गच नसल्यामुळे कापून ठेवलेले भातपीक तरंगताना दिसत होते. ते पाहून अनेक शेतकऱयांच्या डोळय़ांतून पाणी येत होते. वर्षभर कष्ट करायचे, हातातोंडाला पीक आल्यानंतर असे नुकसान झाल्याने शेतकऱयांनी अत्यंत भावनिक होऊन प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
ग्रामीण भागात अवेळी पावसाने साऱयांचीच दाणादाण उडवली. रात्रीच्या या झालेल्या पावसामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. भातकापणी, मळणी ही कामे आता ठप्प झाली आहेत. जवळपास 8 ते 15 दिवस शेतामध्ये पाऊल ठेवणेही कठीण जाणार आहे. त्यामुळे रब्बी पिकाची पेरणीही लांबणीवर पडणार आहे. निसर्गाच्या रुद्रावतारामुळे शेतकरी तणावग्रस्त बनला आहे. एक तर कोरोनासारख्या महामारीला तोंड देत असताना महागाईलाही तोंड द्यावे लागत आहे. त्यातच अचानकपणे निसर्ग पिके उद्ध्वस्त करत आहे. यामुळे आम्ही कसे जगावे, असा प्रश्न शेतकऱयाला पडला आहे.
पाऊस झाल्याने कापून ठेवलेल्या भातपिकाचे, मळणी घातलेल्या शेतकऱयांचे आणि कडधान्य पेरणी केलेल्या शेतकऱयांचे मोठे नुकसान होणार आहे. हातातोंडाला आलेले पीक या पावसाने हिसकावून नेले आहे. यामुळे ‘हा पाऊस नको रे बाबा’ असेच मत अनेकांतून व्यक्त होत आहे. मध्यंतरी थंडीला सुरुवात झाल्याने आता पाऊस पूर्णपणे गेला, अशी समजूत झाली होती. पण हवामानातील बदलाने अचानकपणे पाऊस कोसळल्यामुळे फटका बसला आहे.
तालुक्यात अवकाळीने उडविली दाणादाण
मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने संपूर्ण तालुक्मयाला झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱयांनी कापून ठेवलेले भात पीक तरंगत होते. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे शेतकरी हतबल झाला असून तणावग्रस्त बनला आहे.
सध्या शेतकरी सुगीच्या कामामध्ये गुंतला आहे. याचबरोबर मळणीही करत आहे. त्यातच हा पाऊस आल्याने शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेले भात पीक पाण्यात सापडल्याने नुकसान झाले आहे.
येळ्ळूर परिसरात एक तासांहून अधिक पाऊस
येळ्ळूर परिसरात एक तासांहून अधिक वेळ पाऊस पडला. या पावसाचा जोर इतका होता की बघता बघता सर्वत्र पाणी झाले. रात्री झालेल्या या पावसामुळे शेतकऱयांची झोपच उडाली आहे. बासमती, इंद्रायणी यासह इतर भातांची कापणी शेतकऱयांनी केली होती. ती भाते पाण्यात तरंगत आहेत. अनेक शेतकरी मळणीदेखील करत होते. त्या मळण्याही पावसात अडकल्या आहेत. पावसामुळे किमान आठ दिवस शिवारात काम करणे अवघड जाणार आहे.
पश्चिम भागात सुगीची कामे खोळंबली
तालुक्मयाच्या पश्चिम भागात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन शेतकरीवर्गाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊन ऊसतोडणी मजूर व मेंढपाळांची दैनावस्था झाली.
गेल्या पंधरवडय़ापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाऊस पडेल या भीतीने सुगी कामांना विलंब झाला. भातकापणीचा हंगाम असल्यामुळे भातकापणी, मळणी, बांधणीची कामे भागात सुरू आहेत. शिवारात भातकापणी अद्याप झालेली नाही. रात्रीच्या मोठय़ा पावसामुळे शिवारातील उभे भातपीक अनेक ठिकाणी आडवे पडले. भात झडून जमिनीवर भाताचा सडा पडलेला दिसून येत आहे. भात कापून घातलेल्या भाताच्या गंज्यांमध्ये पाणी जाऊन भात दमसून खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विविध ठिकाणी मळण्या अर्धवट झाल्या. खळय़ावर पाणीच पाणी झाल्याचे प्रकार घडले. मळणीतील गवत भिजल्यामुळे गवत खराब होऊन जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या नाचणा पीक कापणी सुरू आहे. पावसाच्या माऱयाने नाचणा पीक आडवे होऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची चिंता शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. अजूनही ढगाळ वातावरण निवळलेले नसून ऐन सुगीत पडलेला पाऊस नुकसानीचा ठरल्याची चिंता व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्याला तडाखा
कक्केरीत दोन तासात 100 मि. मी. पाऊस : पिके गेली वाहून
खानापूर तालुक्यात मंगळवारी धुवांधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. कक्केरी भागात दोन तासात 100 मि. मी. पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे बिडीत 103 मि.मी. खानापुरात 80 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परिणामी हातातोंडाशी आलेली तसेच कापलेली भात पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱयांना याचा मोठा फटका बसला आहे. या पावसाच्या तडाख्यात जवळपास 130 एकरमधील भात पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे. तर उभी असलेली भात पिकेही धोक्यात आली आहेत.
नंदगड भागात पावसामुळे कापलेली भात पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
कौंदलकडून करंबळकडे जाणाऱया जळगा रस्त्यावरील नाल्याला पाणी आल्याने कापलेले भात पीक नाल्यात वाहून गेल्याने विजय पाटील व राजू पाटील यांच्यासह अनेक शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.