प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात 2 लाख 1 हजार 389 हेक्टरवर पेरणी झाली असून 63.59 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेले क्षेत्र वाया जाण्याची भिती केली जात होती. परंतु शनिवारी बेंदराच्या सणाला पावसाने प्रारंभ केला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून सुरु झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्हय़ाच्या पश्चिम भागात सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र खटाव, माण, फलटणमध्ये केवळ ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, सातारा शहरातही पावसाच्या सरी दिवसभर सुरु होत्या. त्यामुळे हवेत थंडी असल्याने कोरोनाच्या काळात सातारकरांनी घराबाहेर पडणे टाळले.
पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने ज्या भागातल्या पेरण्या झाल्यात त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भिती होती. तर याच उघडीपीमध्ये काहींनी मागास पेरणी करुन घेतली. त्यामध्ये भाताची 51 टक्के, ज्वारीची 64 टक्के, बाजरीची 46 टक्के, मक्याची 51 टक्के अशी जिह्यात सातारा तालुक्यात 24 हजार 92 हेक्टरवर, जावली तालुक्यात 10 हजार 229 हेक्टरवर, पाटण तालुक्यात 55 हजार 351 हेक्टरवर, कराड तालुक्यात 29 हजार 349 हेक्टरवर, कोरेगाव तालुक्यात 21 हजार 381 हेक्टरवर, खटाव तालुक्यात 20 हजार 193 हेक्टरवर, माण तालुक्यात 10 हजार 491 हेक्टरवर, फलटण तालुक्यात 12 हजार 484 हेक्टरवर, खंडाळा तालुक्यात 7 हजार 645 हेक्टरवर, वाई तालुक्यात 9 हजार 404 हेक्टरवर तर महाबळेश्वर तालुक्यात 374 हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झाल्यापासून पावसाने आठ दिवस दडी मारली असल्याने उगवून आलेली पिके कोमजून जाण्याची भिती व्यक्त होत होती. मात्र, शनिवारी दुपारपासून पावसाने प्रारंभ केला. सातारा जिह्यात सातारा शहरासह नजिकच्या गावात व महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण याही तालुक्यात पाऊस सुरु होता
महाबळेश्वर
महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वरमध्ये शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. या मोसमात मागील महिन्याच्या निसर्गचक्री वादळासह दोन दिवस झालेल्या पावसानंतर आज पुन्हा दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे प्रसिद्ध वेण्णा तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ दिसून येत होती. हवामान खात्याच्या नोंदीनुसार या मोसमात आतापर्यंत 1 जुनपासुन 4 जुलैपर्यंत येथे 853.4 मिमी पावासाची नोंद झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनचे आगमन निसर्गचक्री वादळासह मुसळधार पावसाने झाली असली तरी जून महिन्यात तो म्हणावसं टिकला नाही. तसा संपूर्ण महिना कोरडाच गेला. जून महिन्यात 4 जून-187.4 मिमी, 16 जून- 63.0 मिमी, 18 जूना 74.7 मिमि, 19 जून- 61.0 मिमी हे चार दिवसच पावसाचे विशेष ठरले. बाकी जून महिना तसा पावसाच्या दृष्टीने बेताचाच गेला. आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरु होता. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आज सुमारे सात आठ इंच पाऊस नोंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या संततधारेने येथील प्रसिद्ध वेण्णा तलावातील पाण्याची पटली थोडी वाढल्याचे सांगितले जाते.









