देशभरात 99 टक्के पाऊस, जून व सप्टेंबर दमदार, तर जुलै-ऑगस्ट तुटीत
नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने यंदा देशाला भरभरून दान दिले असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यात वायव्य भारतात सरासरीच्या 96 टक्के, मध्य भारतात सरासरीच्या 104 टक्के, पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतात सरासरीच्या 88 टक्के, तर दक्षिणेत सरासरीच्या 111 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. पूर्वोत्तर भारत तसेच लक्षद्वीप, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाची तूट वगळता महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकासह सर्व राज्यांमध्ये यंदा पावसाची स्थिती अत्यंत चांगली आहे.
1 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी मान्सूनचा कालावधी मानला जातो या कालावधीत सर्वसाधारणपणे 88 सें.मी. इतका पाऊस देशभरात नोंदविला जातो. यंदा 87 सें.मी. इतका पाऊस नोंदविण्यात आल्याने सरासरीच्या 99 टक्के पावसाची नोंद झाली आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी सरासरीच्या 76 टक्के इतका पाऊस झाला, तर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक सरासरीच्या 135 टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबरमधील हा दुसरा सर्वाधिक नोंदविला गेलेला पाऊस आहे. याशिवाय जूनमध्ये 110, जुलैमध्ये सरासरीच्या 93 टक्के पाऊस झाला आहे. यात जून ते सप्टेंबरमधील पावसामुळे एकूण सरासरीत वाढ झाली आहे. हंगामात 13 कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली. त्यातील सर्वात जास्त पाच क्षेत्रे ही सप्टेंबरमध्ये निर्माण झाली असून, याच महिन्यात ‘गुलाब’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
दहा विभागात सरासरीहून अधिकचा पाऊस

यावर्षीचा पावसाचा आलेख पाहता, एकूण 10 विभागांत सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. यात पूर्व राजस्थान, हरियाणा, सौराष्ट्र व कच्छ, पश्चिम बंगाल, आंध्र किनारपट्टी, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, कोकण, गोवा, मराठवाडा व अंदमान-निकोबार बेटांचा समावेश आहे. तर 20 विभागांत सरासरीइतका पाऊस झाला असून, या भागातही पावसाची स्थिती समाधानकारक आहे. यात केरळ व महे, तामिळनाडू-पाँडेचरी, कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, सिक्कीम, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पूर्व राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
6 विभागात तुटीचा पाऊस
दरवर्षी पूर्वोत्तर भारताची स्थिती चांगली असते. यंदा मात्र येथे पावसाने पाठ फिरविली असून, या भागात तुटीचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. आसाम- मेघालयात सरासरीच्या उणे 22, अरुणाचल प्रदेश उणे 25, नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरात उणे 32 टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेश उणे 21, जम्मू काश्मीर व लडाख उणे 29, लक्षद्वीप उणे 22 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.
मराठवाडा-तेलंगणाला झोडपले

यावर्षी मराठवाडय़ासारख्या कमी पावसाच्या क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला आहे. अक्षरक्षः या भागाला पावसाने झोडपले असून, या भागात चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 48 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. तेलंगणातही अशीच परिस्थती असून, येथे सरासरीच्या 39 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. या चारही महिन्यांमध्ये या दोन्ही विभागात पाऊस चांगला राहिला. विशेषतः सप्टेंबरच्या महिन्यात येथे अतिवृष्टीही नोंदविण्यात आली.
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
यावर्षी महाराष्ट्रात सरासरीच्या 19 टक्के अधिक पाऊस झाला आहे तसेच सर्वच जिल्हय़ांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्हय़ात अतिवृष्टी, तर मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिममध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. याबरोबरच पालघर, मुंबई शहर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली आदी जिल्हय़ांत पावसाने सरासरी गाठली आहे. तर कर्नाटक, गोव्यातही अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
परतीचा प्रवास 6 ऑक्टोबरनंतर
दुसरीकडे येत्या आठवडय़ाभरात परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात गेले अनेक दिवस कमी दाबांच्या क्षेत्रांची निर्मिती होत आहे. याच्या प्रभावामुळे अनेक भागात गेले अनेक दिवस पाऊस होत आहे. यामुळे परतीचा प्रवासही लांबला आहे. 5 ऑक्टोबरपासून वायव्य भागातील आर्द्रता मोठय़ा प्रमाणात कमी होणार असून, यामुळे पावसाचे प्रमाणही कमी होईल. परिणामी 6 ऑक्टोबरनंतर वायव्य भारतातून परतीच्या मान्सूनला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ऑक्टोबर-डिसेंबरचा पाऊसही चांगला
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान होणारा पाऊसही उत्तरेकडचा तसेच पूर्वोत्तर भारताचा काही भाग वगळता दमदार राहण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे या पावसाबाबतही उत्सुकता असेल.
आयपीसीसीचा अहवाल चिंता वाढविणारा
जागतिक तापमानवाढ हा सर्वांच्याच चिंता वाढविणारा विषय आहे. हरित वायू उर्त्सजनामुळे तापमानात मोठय़ा प्रमाणात बदल होत असून, भूपृष्ठाच्या तापमानात, समुद्रसपाटीच्या तापमानात वाढ होत आहे. यामुळे चक्रीवादळ, दुष्काळ, अतिवृष्टीच्या घटना, पूर, उष्णतेच्या लाटा अशा हवामानाच्या तीव्र घटना वाढत असल्याचा अहवाल आयपीसीसी या जागतिक हवामान संस्थेच्या समितीने जाहीर केला आहे. यामुळे बर्फही मोठय़ा प्रमाणात वितळत असून, हिमनद्या आकुंचन पावत आहेत. तसेच समुद्राच्या पातळीत वाढ होत असून, यामुळे सागरी किनारपट्टीलगतची शहरे बुडण्याचा धोकाही आहे. एका सर्वेक्षणानुसार या शतकाअखेरपर्यंत भारतातील 12 शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसारख्या किनारी भागातील शहरे धोक्यात आली आहेत. हिमालयातील बर्फही वितळत असून, यामुळे उत्तरेकडील नद्यांच्या पुराचा धोका आहे.
सरते दशक सर्वात उबदार
भारत हा तिसरा सगळय़ात जास्त कार्बन उर्त्सजन निर्माण करणारा देश आहे. 2011 ते 2020 हे दशक सर्वात ऊबदार ठरले आहे. तसेच 1970 नंतर वातावरणातील बदल अधिक वेगाने होत असल्याचेही पुढे आले आहे. जसजसे जागतिक तापमान वाढत जाईल, तसतसे जागतिक पर्जन्यमान तसेच जलचक्र यामध्येही बदल हाईल. त्यामुळे याबाबतच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे.
पाणीसाठा वाढला
दमदार पावसामुळे राज्याच्या पाणीसाठय़ातही वाढ झाली असून, तो 84.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. यात सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा विचार करता अमरावती विभागात 85.56, औरंगाबाद 80.69, कोकण 95.11, नागपूर 78.66, नाशिक 81, तर पुणे विभागात 87.76 टक्के पाणीसाठा आहे.
मान्सूनचे विश्लेषण- जून-सप्टेंबरमध्ये दमदार
यंदाच्या हंगामाचे विश्लेषण केले असता, यामध्ये अनेक चढ-उतार दिसून येतात. जून तसेच सप्टेंबरच्या कालावधीत पाऊस चांगला राहिला. सप्टेंबरमध्ये सर्वाधिकम्हणजे सरासरीच्या 35 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. हा पाऊस 2019 नंतरचा सप्टेंबर महिन्यातील दुसरा रेकॉर्डब्रेक असा ठरला आहे. सर्वसाधारणपणे जून हा महिना मान्सूनच्या सुरुवातीचा महिना असल्याने या कालावधीत पाऊस कमी पडणार, हे गृहित धरले जाते. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन, त्याचा प्रवास, संपूर्ण देश व्यापणे या गोष्टी सुरळीत झाल्या. त्यामुळे जूनमध्येही चांगला पाऊस नोंदविण्यात आला.
जुलै-ऑगस्टमध्ये तूट
दुसरीकडे जुलै तसेच ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाचे खंड राहिले. यामुळे या दोन महिन्यात पावसाची तूट राहिली. सर्वसाधारणपणे कोणताही मान्सून हंगाम हा परफेक्ट नसतो. मात्र, सप्टेंबरमधील तुफानी पावसानंतर मान्सूनवर जागतिक तापमानवाढीचा असर होतोय, असे वाटत आहे.
ईशान्य मोसमी पाऊसही चांगला
दक्षिणेकडच्या भागासाठी ईशान्य मोसमी पाऊस हा महत्त्वाचा असतो. तामिळनाडूचा काही भाग वगळता ऑक्टोबर ते डिसेंबरचा ईशान्य मोसमी पाऊस चांगला राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात 12 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
गुलाब चक्रीवादळाची निर्मिती, त्यातून निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा याच्या परिणामामुळेमराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला यंदा पावसाने जोरदार तडाखा दिला. या पावसाने या भागांतील अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केले. शेतांनाही तळय़ांचे स्वरुप आल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या रौद्रधारांचा सोयाबीन, कापूस, कांदा यांसह विविध पिकांना मोठा फटका बसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. महाराष्ट्रात जवळपास 12 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे माहिती आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
एकूणच यंदाचा पावसाचा हंगाम वैशिष्टय़पूर्ण ठरला. ढगफुटी, मोठा खंड वा तूट नि अतिवृष्टी अशीच साधारण स्थिती राहिली. या पावसाने अनेक धरणे काठोकाठ भरल्याने पाण्याचा प्रश्न सुटला. मात्र, अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पीक पाण्यात गेले. स्वाभाविकच हवामानातील बदलानुसार पीक पद्धतीत बदल करण्याचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पावसाचे प्रमाण
हंगामातील एकूण पाऊस ः 99 टक्के
जूनचा पाऊस ः 110 टक्के
जुलैचा पाऊस ः 93 टक्के
ऑगस्टचा पाऊस ः 76 टक्के
सप्टेंबरचा पाऊस ः 135 टक्के
– अर्चना माने-भारती, पुणे








