अलमट्टी 80, वारणा 55 तर कोयना धरण 40 टक्के भरले
प्रतिनिधी/सांगली
गत आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचबरोबर पहिल्या पावसाच्या घातीने झालेल्या पेरण्याही पाऊस लांबल्याने अडचणीत आल्या आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांच्या पाणीसाठÎात संथगतीने वाढ सुरू आहे.
रविवारी सकाळपर्यंत वारणा धरण 55 टक्के भरले तर कोयनेतील साठा 40 टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. पावसाळÎात ज्या धरणाच्या पाणीसाठÎाकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते ते कर्नाटकातील अलमट्टी धरण मात्र 80 टक्क्यांच्या पुढे भरले आहे. त्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांच्या खोऱयात पावसाचा जोर कमी आला असला तरी अलमट्टी धरणातील साठा गतीने वाढत असल्याने सांगली, कोल्हापुरातील नदीकाठच्या गावांचा ठोका चुकला आहे.
सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व दोन पाऊस दमदार झाल्याने शेतकऱयांनी पेरणीपूर्व मशागतींना सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या पावसाने जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पेरण्या घातीने झाल्या. भात, सोयाबीन, मका, बाजरीसह कडधान्यांच्या पेरण्या जोरात झाल्या. सोयाबीन पेरणी अथवा टोकणी धडाक्यात झाली. शेतकऱयांनी खते बियाणांची खरेदी केली आहे. परंतु आठ ते दहा दिवसांपासून पावसाचे उघडीप दिली आहे.
ज्या शेतकऱयाकडे सिंचनाची शाश्वत सुविधा आहे. त्यांची भात, सोयाबीन, मका, भुईमूग अशी पिके जोमात आहेत. परंतु बाजरी, ज्वारीसह कडधान्यांची आणि सिंचनाची सोय नसलेल्या शेतीमधील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पेरणीनंतर उगवलेले मोड आता कोमेजू लागले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे.
…तर दुबार पेरणीचे संकट शेतकरी अडचणीत येणार
वेळेवर पेरण्या झाल्याने सर्वच पिके तरारून उगवली आहेत. परंतु पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके धोक्यात आली आहेत. आणखी आठवडाभर जर पाऊस पडला नाही तर सिंचनाची सोय नसलेला खरिपाचा पेरा वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवून शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन यापूर्वीच कृषी विभागाने केले आहे.
चोवीस तासात 5.6 मिमी पावसाची नोंद
गत 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जत, आटपाडी, कमठेमहांकाळ वगळता हे तीन तालुके वगळता पावसाने सर्वत्र उघडीप दिली आहे. जत तालुक्यात 32.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात 12.4 तर कवठेमहांकाळमध्ये 4.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून आजपर्यंत मिरज तालुक्यात 232.9 मिमी, जत तालुक्यात 166.1, खानापूर-विटयामध्ये 97.5, वाळवा-इस्लामपूर 240.7, तासगाव तालुक्यात 161, शिराळा तालुक्यात 355.3, आटपाडी 94.8, कवठेमहांकाळ मध्ये 146.2 , पलूस तालुक्यात 220.7 आणि कडेगाव तालुक्यात 171.3 मिमी पाऊस झाला आहे.
वारणा धरण 55 टक्के भरले
रविवारी सकाळी वारणा धरण 55 टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता 34 .40 टीएमसी असून आतापर्यंत 18.83 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. तर
105. 25 टीएमसी क्षमता असणाऱया कोयना धरणात 42.37 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
अलमट्टीचा विसर्ग 20 हजार क्युसेकने सुरू
पावसाने उघडीप दिली असली तरी विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे कृष्णा आणि वारणा नद्यांमध्ये विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातील पाणीसाठÎात वेगाने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे 123 टीएमसी साठवण क्षमता असणाऱया अलमट्टी 89.40 टीएमसी साठा झाला आहे. हे धरण अल्पावधीतच 80 टक्के भरले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱया महापुराशी अलमट्टी धरणातील पाणीसाठÎाचा संबंध असल्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे अलमट्टीचा पाणीसाठा आणि विसर्ग यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवण्याचा निर्णय झाला आहे. अलमट्टीतून 20 हजार 451 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.








