गेल्यावषी आजच्याच तारखेला पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांची भरून वाहण्याबद्दल आपापसात स्पर्धा लागली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली जिह्यात महापुराच्या संकटाला प्रारंभ झाला होता. आणि यावषी कृष्णाखोऱयातील धरणे अर्ध्यापेक्षा अधिक रिकामी आहेत. एरव्ही जून महिन्यात पाऊस ओढ देतो आणि जुलै महिन्यात चांगला बरसतो हा आतापर्यंतचा अनुभव. पण यावषी पावसाने वेगळाच खेळ खेळला. जून महिन्यात पावसाला चांगली सुरुवात झाली मात्र जुलै महिन्यात मोठा खंड पडला. हा खंड हवामान तज्ञांना अपेक्षित होता. मात्र सर्वसामान्यांना या स्थितीने चांगलेच धास्तावले आहे. विशेषतः शेतकरी वर्गाच्या चिंतेत मोठी भर पडली. गेल्यावषी नदीकाठच्याच नव्हे तर दुष्काळी पट्टय़ातही पाऊस बरसत होता हे तो विसरलेला नाही. पावसाळय़ाच्या सुरुवातीला तर कृष्णा खोरे पुन्हा महापुराच्या संकटाला तर सामोरे जाणार नाही ना अशी शंका व्यक्त केली जात होती. जून अखेर पडलेल्या पावसाने तशी भीतीही निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्यात राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ओढ दिली आणि त्यावर अवलंबून असणाऱया मोठय़ा शहरांमध्ये पाणी कपातीची चिंता व्यक्त होऊ लागली. गतवषी आजच्याच दिवशी कृष्णाखोरेतील 16 धरणे शंभर टक्के भरली होती. तर सध्या कोयना 47, वारणा 58, दूधगंगा 64, राधानगरी 59, उरमोडी 65, कन्हेर 45, चाकसमान 17, डिंभे 37, मुळशी 28, भाटघर 40,वीर 40 टक्के भरले आहे. धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 33 ते 35 टक्केच आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसारखी शहरे आणि त्यांच्या महानगर पालिकांना अशावेळी घाम फुटतो. 1 ऑगस्ट या तारखेला पुरेसे पाणी नसेल तर या अक्राळविक्राळ वाढणाऱया शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रभावित होऊन पाणी कपातीशिवाय पर्यायच उरत नाही. हीच स्थिती काही वेळा मुंबईचीही होते. स्वत:चे धरण असलेली महापालिकाही मग नाशिक जिह्यात पुरेसा पाऊस होऊ दे अशी प्रार्थना करु लागते. यावषी मुंबईत पाणी कपात सुरुही झाली आहे. सध्या पाऊस पडू दे अशी प्रार्थना पुणे, पिंपरी चिंचवड करत असेल तर ते चुकीचेही नाही. जुलैचा पहिला आठवडा संपता संपता पाऊस सुरु होतो आणि महिना अखेरपर्यंत पडलेल्या पावसाने धरणे भरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. अशी पिंपरी चिंचवडची सवय. पण यावषी पवना धरणाच्या पट्टय़ात पावसाने ओढ दिली. खडकवासला, पानशेत, टेमघर आणि पवना धरण 20 ते 30 टक्के इतकेच भरले आहे. ज्या औद्योगिक नगरीत निर्वाहासाठी पूर्ण महाराष्ट्रातील जनता एकवटते तिथली चिंता मग एका शहराची रहात नाही. नेहमी हमखास पाऊस पडणाऱया भागात निम्मा हंगाम संपला तरी पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटकातील जिह्यांमध्ये होत असतो. गतवषी प्रलयंकारी, शतकातील सर्वात मोठय़ा महापुराच्या संकटाला सामोरे जाणारा हा भाग यावेळी वेगळय़ाच संकटाला सामोरा जात आहे. हे अद्भूत म्हणावे की यातनादायी असा प्रश्न इथल्या जनतेला पडलेला आहे. महापुराच्या वेळी स्वतःची व्यवस्था स्वतः करा अशा प्रकारची नोटीस प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारने मे महिन्यातच दिली होती. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात जायचे कुणाच्या दारात असा प्रश्न जनतेला पडला होता. उंच माळावर जागा-खोली भाडय़ाने घेऊन तेथे तात्पुरती सोय लावण्याची धडपड ग्रामीण भागात अनेकांनी आधीच केली असली तरी शहरी जनतेला हा पर्यायच नसल्याने ते भांबावलेलेच आहेत. पाऊस नाही याचा त्यांना दिलासा वाटत होता हे त्याहून विशेष! आपल्या भागात कुठला पाऊस पडतो असे म्हणणाऱया मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील कोरडवाहू तालुक्मयात 127 ते 93 टक्के पाऊस झाला आहे. पावसाळय़ात आपल्यावर कृपावृष्टीच झाली अशा भावनेतून तिथली जनता आनंदात आहे! उजनी धरणाच्या जलाशयाला यंदा पश्चिम मावळातील जलाशयांकडे पाहून हसावेसे वाटले असेल. एरव्ही मोकळय़ाढाक असणाऱया या धरणात 12 ते 13 टक्के उपयुक्त साठा आहे. दोन महिन्यात 13 टक्के पाणी वाढले आणि सोलापूर जिह्यातही पाऊस झाल्याने मागणी अभावी उजनीत पाणी भरुन राहिले आहे! पावसाचे हे सारे खेळ आश्चर्यचकित तर करतातच पण ज्यांच्या चेहऱयावर सदैव हासू त्यांचे चेहरे रडवेले आणि सदा रडणाऱयांच्या डोळय़ात आनंदाचे अश्रू उभे आहेत! निसर्गासाठी हा खेळ असला तरी मानवांसाठी तो न परवडणारा आहे. त्याने दुष्काळी भागात बरसावे पण सुकाळी भागातीलही घडी बिघडवू नये अशी लोकांची अपेक्षा असते. पण निसर्गचक्र जेव्हा फिरायला लागते तेव्हा त्याचा वरवंटा क्रूरपणेच फिरत असतो. त्याने दुष्काळी भागात कधी चक्र बदलेपर्यंत दया दाखवलेली नाही, मग आताच कशी सुधारणा घडेल? जून महिन्याच्या पहिल्या तारखेला हवामान आणि कृषी तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी जुलैमध्ये पावसात मोठा खंड पडेल आणि उर्वरित काळात 98 टक्केपर्यंत सरासरी गाठेल असे निरीक्षण नोंदवले होते. कमी काळात जास्त पाऊस होऊन ही सरासरी गाठली जाईल असेही डॉ. साबळे यांनी म्हटले होते. जुलै महिना अखेरपर्यंतचे त्यांचे निरीक्षण तंतोतंत खरे ठरले आहे. आता हवामान खात्याने सहा ऑगस्टपासून राज्यभर पाऊस सुरु होईल आणि मुंबई, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आणि शहरी जनतेला दिलासा मिळाला आहे. या दिलाशाबरोबरच सातत्याने पावसाचा कमी होणारा कालावधी, थोडय़ाच काळात प्रचंड पाऊस या बाबी चिंताजनक बनत चाललेल्या आहेत. गेली काही वर्षे डॉ. साबळे यांच्यासारखे तज्ञ याकडे सातत्याने निर्देश करत आहेत. देशाने आणि राष्ट्रप्रमुखांनी या आव्हानाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आसाममध्ये झालेला पाऊस, गतवषी महाराष्ट्र कर्नाटक, त्यापूर्वी केरळ, बिहार या स्थानिक आपत्ती राष्ट्रीय बनल्या आहेत. बदलत्या हवामानाच्या या आव्हानाने समाजमन तात्पुरते अस्वस्थ होऊन चालणार नाही. या संकटाला गांभिर्याने घेतले पाहिजे. पण कधीपासून हा खरा प्रश्न आहे.
Previous Articleखोटय़ा वयाच्या दाखल्याची कबुली देणाऱया क्रिकेटपटूंना शिक्षा नाही
Next Article सायकलींग सराव शिबिराला दिल्लीत प्रारंभ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








