कुडाळ पं. स. बैठकीत धक्कादायक माहिती : संबंधितांवर कारवाईची मागणी : चौकशीचे आदेश
प्रतिनिधी / कुडाळ:
पावशी येथील बचतगटांच्या ग्रामसंघातून 4 लाख 69 हजार 280 रुपये परस्पर काढून अपहार केल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी येथे झालेल्या कुडाळ पं. स. च्या मासिक बैठकीत मावळते सभापती राजन जाधव यांनी देऊन सभागृहात कागद सादर करून, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी केली. याप्रकरणी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले.
तर यापूर्वीच्या बैठकांमधून झालेल्या सूचनांची पूर्तता झाली नसेल, त्यावर विसंगत माहिती देण्याच्या कारणावरून जाधव यांच्यासह संदेश नाईक, अरविंद परब, गोपाळ हरमलकर आदी सदस्यांनी नूतन सभापती नूतन आईर यांना कचाटय़ात पकडण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत जाधव यांनी प्रत्येक सूचनेवर चर्चेत भाग घेऊन प्रश्न उपस्थित केले. उपसभापती जयभारत पालव व मिलिंद नाईक यांची सकारात्मक भूमिका, ‘जाधव साहेब, तुम्ही सभापती असतानाचे हे सगळं आहे. हे समजून घ्या आणि बोला’, अशा शब्दात नूतन सभापतींनी दिलेला घरचा आहेर व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचा प्रशासकीय अनुभव हे आजच्या बैठकीचे विशेष होय.
कुडाळ पं. स. च्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती नूतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती पालव, गटविकास अधिकारी चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. मावळते सभापती-उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामसंघाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप
पावशी बचतगटांच्या ग्रामसंघात झालेल्या अपहाराची माहिती जाधव यांनी सभागृहात चर्चेला घेतली असता संबंधित अधिकाऱयाने दिलेली उत्तरे बरोबर नसून संबंधित ग्रामसंघाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. यावेळी झालेल्या चर्चेत अरविंद परब, हरमलकर यांच्यासह सदस्यांनी भाग घेतला.
शंभरही ग्रामसंघांच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश
या प्रकरणी प्राथमिक चौकशी झाली असून त्यात बचतगटाचा समूधान संसाधन व्यक्ती (सीआरपी) दोषी आहे. ग्रामसंघाकडील चेकबुक घेऊन त्यांनी परस्पर पैसे काढले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी देऊन ग्रामसंघाने फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे सांगितले आहे. मात्र, त्यावर वादळी चर्चा झाली. प्राजक्ता प्रभू, शरयू घाडी, मिलिंद नाईक, संदेश नाईक आदींनी भाग घेतला. शेवटी तालुक्यातील शंभरही ग्रामसंघांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याची सूचना केली. तसेच पावशी ग्रामसंघाची स्वतंत्र चौकशी करा व फौजदारी दाखल करा, असे पालव यांनी सांगितले.
बचतगटात कर्मचारी आहेत. बचतगटातून त्यांचा राजीनामा घेतल्याचे सांगताच मिलिंद नाईक भडकले. कारवाई सांगा, असे सांगितले असता, उपसभापती पालव यांनी कार्यवाही होईल, असे सांगितले.
माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा इमारतीचा प्रस्ताव येथील शिक्षण विभागात महिनाभर पडून राहिल्याने निधी मिळाला नाही, याकडे लक्ष वेधले व प्रस्ताव येथे कोणी ठेवला, याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी मिलिंद नाईक यांनी केली. या चर्चेत शरयू घाडी, स्वप्ना वारंग, सुप्रिया वालावलकर व राजन जाधव यांनी भाग घेतला.
प्राजक्ता प्रभू यांनी शेतीपंपाच्या वीज बिलाकडे व एसटीच्या प्रश्नाबाबत अधिकाऱयांना धारेवर घरले. पाट येथील बचतगटाने निवडणूक आचारसंहितेत पैसे वाटल्याच्या तक्रारीवर दिलेले उत्तर मान्य नसून परिपूर्ण अहवाल देण्याची मागणी डॉ. सुबोध माधव यांनी केली. यावेळी जाधव, परब व मिलिंद नाईक यांनी चर्चेत भाग घेतला. भडगाव ग्रामसभा अजेंडय़ाप्रमाणे न घेता आदल्या दिवशी सभा घेतल्याचे अरविंद परब यांनी निदर्शनास आणले असता, माहिती मागितल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या चर्चेत मिलिंद नाईक यांच्यासह सदस्यांनी भाग घेतला.
सभागृहाला असेही ‘लिकेज’
कडावल रस्त्याचे काम योग्य पद्धतीने होत नाही. कामाची चौकशी करण्याचा ठराव संदेश नाईक यांनी मांडला. त्यावर चर्चा सुरू असतानाच संबंधित ठेकेदाराचा नाईक यांच्या बाजूलाच असलेल्या सदस्याच्या मोबाईलवर ठराव कोणी मांडला आणि चर्चा कोणी केली, असा आलेला मेसेज नाईक यांनी बघितला आणि सभागृहाला लिकेज आहे. आम्ही ज्या विषयावर चर्चा करतो, तो विषय बैठक संपण्यापूर्वीच ठेकेदाराला समजतो, हे बरोबर नाही, असे सांगून नाराजी व्यक्त केली. यावर अरविंद परब, राजन जाधव आदींनीही नाराजी व्यक्त केली. प्राजक्ता प्रभू यांनी तर बैठक सुरू होण्यापूर्वी सर्वांचे मोबाईल सभापतींनी घ्यावेत, अशी सूचना केली. सभापती-उपसभापती व गटविकास अधिकाऱयांनी यापुढे असे होऊ नये, असे सांगितले.









