वैभव माळी / पलूस
आज अनेक लोक पैशाच्या पाठीमागे धावतात, मोठया पगारादारांना देखील पैशाचा मोह आवरत नाही, तर अलिकडच्या काळात अवघ्या दहा व वीस हजार रूपयांची लाच स्विकारातना अधिकारी सुध्दा लाचलुचपतच्या जाळयात सापडत आहेत हे वास्तव एकीकडे असताना आपल्या पुढयात तब्बल पाच लाख सत्तर हजार रूपयांचे गाठोड येऊन पडले. अशा व्यक्तींने काय कराव? तर त्यानं ज्या व्यक्तीचे पैसे पडले आहेत त्यांचा शोध घेऊन ती रक्कम जशीच्या तशी परत केली. अशा प्रामाणिक व्यक्तीचे नाव आहे प्रशांत विजय सकट मूळगाव मायणी पाचवड सध्या सांडगेवाडी येथील रामकृष्ण फ्रॅब्रीकेटर्स मध्ये ते वेल्डर म्हणून काम करतात.
पत्र्यांच्या शेड मध्ये राहून कष्ट करून कुटुंबाचा उर्दरनिर्वाह करणाऱया प्रशांत सकट यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वस्थरातून कौतुक होत आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वतः त्यांच्याशी फोनवरून बोलून शब्बास तु माझ्या मतदार संघातील पलूसचे नाव काढलस अशा शब्दात त्याचे कौतुक केले व तुला मी भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. प्रशांत सकट याच्या प्रामाणिकपणाबद्दल सोशल मिडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, इतिहासकार डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी प्रशांत सकट यांचा सत्कार करून गौरव केला.
प्रशांत सकट यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले, माझ शिक्षण बारावी सायन्स पर्यत झाले आहे. माझा विवाह झाला असून मला दोन मुले आहेत. पत्नी आशावर्कर म्हणून काम करते. गेल्या दोन वर्षापासून सांडगेवाडी येथील आश्रामशाळेसमोरील बाजूस रहातो. मूळ गाव मायणी पाचवड असून कामानिमित्त सांडगेवाडी येथे आलो आहे. नेहमीप्रमाणे दुपारी कामावरून घरी जेवण करण्यासाठी आलो होतो. घरात जेवणकरून सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कामावर जात असताना सांडगेवाडी-पलूस रस्त्यावरील मदर युनिट जवळ मला माझ्या पत्नीचा फोन आला फोनवर बोलत असताना पांढऱया रंगाची पैशाने भरलेली दिसली. ती पिशवी घेवून मी घरी आलो. घरात आल्यानंतर दोघा पती-पत्नीने ठरवले ज्यांचे हे पैसे पडले आहेत त्यांना परत करायचे एवढी मोठी रक्कम असणारा व्यक्ती हा काही तरी महत्वाच्या कामानिमित्त घेऊन चालला असेल?
प्रशांत यांनी ठिकाण व पत्ता सांगत पैसे कुणाचे असतील त्याने घेवून जावे असा संदेश मोबाईवरून व्हायरल केला. दोन तासाने हा संदेश पाठवून काही लोकांनी चाचपणी केली परंतु ज्यांचे फोन येत होते त्यांच्याकडे खात्री केल्यानंतर त्यांच्या बोलण्यात रक्कमेचा उल्लेख होत नव्हता. साडेपाच वाजता त्यांना देवराष्ट्रे येथील तात्यासाहेब गायकवाड यांचा फोन आला त्यांनी पिशवी व पैशाचे तसेच नोटांचा तपशील यांचे वर्णन बरोबर सांगितल्याने त्यांनाही रक्कम परत केली. तात्यासाहेब गायकवाड यांच्या हातात हारवलेली रक्कम पडताच त्यांना अश्रु अनावर झाले त्यांचे हात थरथर कापू लागले त्यांनी दहा हजार रूपयांचा बंडल काढून प्रशांत यांना दिला पण त्याने तो स्विकारला नाही. आज सारे जग कोरोना योध्दात कोलमंडल असताना स्वतःच्या कमाईवर कसे जगावे हे प्रशांत याने दाखवून दिले आहे. पाच लाख सत्तार हजार रूपये प्रामाणिकपणे परत करणारा प्रशांत घर बांधू शकला असता परंतु त्याने स्वतःच्या घरापेक्षा ज्यांचे पैसे पडलेत त्यांची तळमळ ओळखली जाणली आणि त्याने ते पैसे परत केले. प्रशांतच्या या प्रामणिक कामाला पलूससह परिसरातून सलाम होत आहे.