भात खरेदीवरील बोनस : शासनाकडून मार्केटिंग फेडरेशनकडे वर्ग : सात हजार शेतकऱयांना होणार लाभ
दीपक गावकर / ओटवणे:
शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत प्रोत्साहनपर जिह्यातील
प्रतिक्विंटल 700 रुपये बोनसच्या 5 कोटी 75 लाख 81 हजार 496 रकमेपैकी 50 टक्के रक्कम शासनाकडून राज्य मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाली आहे. त्यामुळे तब्बल तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिह्यातील 6 हजार 890 शेतकऱयांना बोनसची एकूण 2 कोटी 87 लाख 90 हजार 748 एवढी रक्कम आठवडाभरात मिळणार आहे. याबाबत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक अतुल नेरकर यांनी जिल्हा पणन कार्यालयाला कळविले आहे. बोनसची ही 50 टक्के रक्कम त्वरित शेतकऱयांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शासकीय आधारभूत किंमत खरीप हंगाम भात खरेदी योजनेचा यावर्षी जिह्यातील एकूण 6 हजार 890 शेतकऱयांनी लाभ घेतला. गेल्यावर्षी जिह्यात 36802:13 क्विंटल तर यावर्षी 82259,28 क्विंटल दुपटीहून अधिक भात खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी भात विक्रीतून शेतकऱयांना 6 कोटी 69 लाख 41 हजार 066 रुपये रक्कम आणि 2 कोटी 58 लाख 17 हजार 491 रुपये बोनस मिळून 9 कोटी 27 लाख 58 हजार 557 रुपये प्राप्त झाले होते. तर यावर्षी 15 कोटी 36 लाख 60 हजार 335 रुपये मिळाले. मात्र, या भात खरेदीवरील एकूण 5 कोटी 75 लाख 81 हजार 496 रुपये बोनसच्या प्रतीक्षेत गेले तीन महिने शेतकरी होते.
ही सर्व भात खरेदी सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड, मालवण, वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघासह कणकवलीतील शेतकरी सहकारी संघ, जिल्हा कृषी औद्योगिक संघ, बजाज सिंधुदुर्ग राईस मिल या नऊ संस्थांमार्फत करण्यात आली होती. जिह्यातील शेतकऱयांकडील भात ऑनलाईन पद्धतीने भात खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आले होते. यावर्षी भात खरेदी योजनेला जिह्यातील शेतकऱयांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. जिह्यातील एकूण 35 भात खरेदी केंद्रावरून भाताची खरेदी करण्यात आली होती.
सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी भात खरेदी केंद्रावर 3362 : 03, मळगाव 2431.20, मळेवाड 1850:80, तळवडे 1398:62, मडुरा 1769.01, डेगवे 1462.22, कोलगाव 2598.78, इन्सुली 1501.37, दोडामार्ग तालुक्यात भेडशी 1830.99, कुडाळ तालुक्यात कुडाळ 9063:24 कसाल 702:19, माणगाव 2219:53, कडावल 1246:46, घोडगे 603:82, ओरोस 1929.12, पिंगुळी 2758.13, निवजे 3905.72, आंब्रड 3163.26, हिर्लोक 485.06, पणदूर 554.79, देवगड तालुक्यात देवगड 1153.36, पाटगाव 1929.91, वेंगुर्ले तालुक्यात वेंगुर्ले 5829:10, तुळस 555.13, वैभववाडी तालुक्यात वैभववाडी 3945.50, मालवण तालुक्यात पेंडूर 2335.20, कट्टा 6187.60, कसाल 702:19, चौके 537.15, कणकवली तालुक्यात कणकवली 4304.47, फोंडा 4038.14, कनेडी 816:56, खारेपाटण 353.15, हरकुळ खुर्द 1247.75, हरकुळ बुद्रुक 2844.21, करुळ 1364.71 अशी एकूण 82259.28 क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती.









