सिलिंडरच्या स्फोटाने लागली आग, मोठय़ा प्रमाणात हानी

प्रतिनिधी / काणकोण
नुकताच कोठे पर्यटन हंगाम सुरू झालेला असताना पाळोळे किनाऱयावरील एका हॉटेल आणि हंगामी शॅक्समध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागण्याचा प्रकार 22 रोजी रात्री घडला. सुदैवाने मनुष्यहानी टळली. काणकोणच्या अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे 7.45 च्या दरम्यान ही घटना घडली. हंगामी शॅक्सच्या गोदामात प्रथम आग लागली. आगीचा भडका इतका जबरदस्त होता की, सदर हंगामी शॅक्सच्या जवळ असलेल्या काही दुकानांनाही त्याची झळ बसली. आग विझविण्यासाठी काणकोण तसेच मडगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्याचा प्रसंग आला.
या ठिकाणी आग लागली असल्याची खबर मिळताच काणकोणचे आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, दिवाकर पागी यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती समजून घेतली. आग आटोक्यात येईनाशी दिसल्यानंतर काही खासगी टँकरच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आग विझवायला मोलाचे सहकार्य केले. काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या आगीत नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज आला नाही.









