प्रतिनिधी / काणकोण
काणकोणच्या पोलिसांनी 23 रोजी सकाळी होवरे, पाळोळे येथील एका हॉटेलवर छापा मारून 3 किलो 680 ग्रॅम इतका गांजा पकडला. त्याची किंमत 3 लाख 68 हजार रु. इतकी भरते. चालू वर्षातील हा काणकोणातील सर्वांत मोठा छापा असून आतापर्यंत अमली पदार्थविषयक 5 गुन्हे काणकोण पोलीस स्थानकावर नोंद झालेले आहेत. यापुढे देखील अमली पदार्थविरोधी मोहीम चालू राहणार असल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिली.
गांजासहित पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव कालिचरण कृष्णन (वय 35 वर्षे) असे असून सदर इसम पाटणे येथील एका हॉटेलात उतरला असल्याची माहिती काणकोणच्या पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास, स्वदेश देसाई, हवालदार अक्षय नाईक, कुष्टा फळदेसाई, कॉन्स्टेबल धनंजय देसाई यांनी दबा धरून सदर व्यक्तीला मुद्देमालासहित ताब्यात घेतले. सदर व्यक्तीचा अन्य कोणाबरोबर संबंध आहे का आणि त्याचे या ठिकाणी अन्य कोणाशी व्यवहार चालत होते का याचा तपास सध्या चालू असून संशयिताला लवकरच काणकोणच्या न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असल्याची माहिती गावस यांनी दिली.









