वृत्तसंस्था/ पालेर्मो
डब्ल्यूटीए टूरवरील इटलीतील पालेर्मो येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेतून रूमानियाची माजी टॉप सीडेड आणि विद्यमान द्वितीय क्रमांकाची टेनिसपटू सिमोना हॅलेपने माघारीचा निर्णय घेतल्याने स्पर्धा आयोजकांनी निराशा व्यक्त केली.
सध्या इटलीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याने रूमानिया आणि बल्गेरिया येथून इटलीत येणाऱया नागरिकांसाठी ठराविक मुदतीकरिता क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. इटलीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पिरेंझा यांनी सदर माहिती दिली आहे. गेल्या दोन आठवडय़ांच्या कालावधीत रूमानिया आणि बल्गेरिया या दोन देशांतून इटलीत दाखल झालेल्या नागरिकांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली असून खबरदारीचे उपाय म्हणून इटलीच्या शासनाला कोरोनापासून अधिक जागरूक रहावे लागत असल्याचे स्पिरेंझा यांनी सांगितले.
कोरोना महामारी समस्येनंतर तब्बल पाच महिन्यांनी डब्ल्यूटीए आणि एटीपी टूरवरील व्यावसायिक टेनिस स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पार्लेमोतील ही महिलांची पहिली टेनिस स्पर्धा आहे. सदर स्पर्धा सिसेलियनची राजधानी पार्लेमो येथे 3 ऑगस्टपासून क्ले कोर्टवर खेळविली जाणार आहे. रूमानियात पुन्हा कोरोनाचे रूग्ण अधिक प्रमाणात मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करताना धोका पत्करण्याची माझी तयारी नसल्याने आपण पार्लेमो टेनिस स्पर्धेतून माघार घेत असल्याचे हॅलेपने आपल्या ट्विटरवर सांगितले. हॅलेप ही विंबल्डन स्पर्धेतील विद्यमान विजेती असून तिने 2018 साली प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती.









