बंद एस.टी बाबत विचारला जाब, बस सुरू नसल्याने विध्यार्थ्यांचे होत आहेत हाल.
प्रतिनिधी / लांजा
लांजा आजारातून नियमित सुरू असलेली पालु एस.टी. फेरी अनेक दिवसांपासून बंद केल्याने पायपीट करून विध्यार्थ्यांचे अक्षरशः हाल होत आहे. लांजा आगाराला निवेदने व माहिती देऊनही बस फेरी सुरू न केल्याने पालु गावातील ग्रामस्थानी मंगळवारी लांजा एस टी आगाराला धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.
कोरोना काळापासून लांजा-पालु एस.टी. फेरी बंद आहे. लांजा आगारातून सुटणारी लांजा-पालु एस.टी. गेले अनेक दिवस बंद असल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांना १४ किमीची पायपीट करावी लागत आहे. आगाराशी संपर्क साधून एस.टी फेरी सुरू करण्याबाबत वारंवार विनंती करुन देखील दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी मंगळवारी लांजा एस.टी. आगारप्रमुख संदीप पाटील यांना घेराव घालून बंद असलेली पालु एस.टी. सुरू करण्याची मागणी केली.
शिपोशी, भांबेड, लांजा याठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे एस.टी. बस अभावी मोठे हाल होत आहेत. कोरोना परिस्थिती असल्यामुळे पालु एस.टी. फेरी बंद करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने सर्वत्र एस.टी. फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र लांजा- पालु एस.टी. बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील शाळा, कॉलेज सुरू झाले असल्याने येथील विद्यार्थ्यांना एस.टीची गरज भासत आहे. पालु गावात ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घेत आर्थिक भुर्दंड पडत आहे. आगाराशी संपर्क साधून एस.टी. फेरी सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे आगार साफ दुर्लक्ष करत असल्याने आज ग्रामस्थांनी आगर प्रमुखांना घेराव घालावून बंद असलेली एस.टी. फेरी सुरू करण्याची मागणी केली.
गाड्यांना टायर नसल्याने एस.टी. फेरी नसल्याचे कारण यावेळी आगारप्रमुखांनी नागरिकांना दिले. मात्र, नागरिकांच्या जोरदार मागणीपुढे व मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊन आगार प्रमुख संदीप पाटील यांनी बुधवारपासून एस. टी. फेरी सुरू करणार असल्याचे पालक व ग्रामस्थांना अश्वासन दिले.









