प्रतिनिधी/ सातारा
शुक्रवार सातारा शहरवासियांना धडकी भरवणारा ठरला. रात्रीच त्यांना आपले रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समजले. सातारा पालिकेत कोरोना कक्षात कार्यरत असलेल्या सहाय्यक कर निरीक्षक महिला अधिकाऱयास कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच सकाळी पालिकेचे शटर डाऊन झाले. त्यांनी स्वतःचा विवाह सोहळय़ाला जाण्याकरता एक महिन्याची सुट्टी काढली होती. तत्पुर्वी वैद्यकीय तपासणी केल्याने त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आता उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यांच्या सहवासात पालिकेतील कोण कोण आले आहेत याची यादीच काढण्याचे काम सकाळी सुरु होती. संपूर्ण पालिकेची इमारतच निर्जंतूक करण्यात आली. दरम्यान, शहरात प्रतापगंज पेठेतील कोरोना बाधित मुंबईस्थित नोकरी करत आहेत. गोडोलीतील बाधित युवक यापुर्वीच आजारी होता.
सातारा शहरावासियांकरता शुक्रवारीचा दिवस धडकी भरवणारा ठरला. सकाळी कोरोना कोणाकोणाला झाला हे माहिती पडताच पळापळ सुरु झाली. सातारा पालिकेत स्वतंत्र असलेल्या कोरोना कक्षातील कोरोना सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱयास बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे वय 27 असून गोल मारुती मंदिर परिसरात यादोगोपाळ पेठेत राहतात. त्यांचा विवाह दि.14 रोजी होता. त्या मुळच्या सोलापूर जिह्यातील माढा येथील आहेत. त्यांनी त्यांच्या विवाहाकरता जाण्यासाठी सातारा पालिकेकडे एक महिन्याची सुट्टी मागितली होती. त्याकरता सुट्टीही मंजूर करण्यात आली होती. विवाहाला जाण्यासाठी दुसरा जिल्हा ओलांडून जाण्यासाठी त्यांनी स्वतःची मेडिकल तपासणी दोन दिवसांपूर्वी केली. त्याचा अहवाल हा रात्री 11 वाजता त्यांना मिळाला. रिपोर्ट पाहताच त्यांची झोप उडाली. त्या गुरुवारीही पालिकेत कामावर होत्या. ठणठणीत असल्याने त्यांच्या सानिध्यात पालिकेतील अनेकजण आले आहेत. सकाळी जेव्हा ही बाब समजली तेव्हा पालिकेचे शटर डॉऊन करण्याच्या सुचना दस्तुरखुद्द मुख्याधिकाऱयांनीच दिल्याचे समजते. पालिकेची सर्वच इमारत सॅनिटायझर करण्यात आली. त्यांच्या संपर्कात जे जे कर्मचारी आले होते. त्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. त्यामध्ये आता कोणाकोणाला कोरोनाटाईन व्हावे लागते कोणाचे स्वाब घेतले जातात, याचीच चिंता लागून राहिली आहे. पालिका किती दिवस बंद ठेवावी लागते याकडे सगळय़ांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, गोडोलीतील भंडारी प्लाझा येथे रहाणारा 32 वर्षीय युवक हा आजारी होता. उपचारासाठी तो रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची टेस्ट घेण्यात आल्याने तो बाधित असल्याचे समजले. तसेच प्रतापगंज पेठेतल्या मुंबईत नोकरीनिमित्त असलेला 46 वर्षाचा पुरुष हा पनवेल येथे स्थायिक आहे. तेथेच तो एसटीमध्ये नोकरीला आहे. त्याचा एक प्लॅट प्रतापगंज पेठेत असून तो दोन दिवसांपूर्वी साताऱयाला आला आहे. त्यालाही बाधा झाली आहे. तसेच रविवार पेठेतील महिला ही कोरोना बाधित असून ती निकट सहवासित आहे. कोडोली येथील 75 वर्षाचा पुरुष तर जिहे येथे 19 वर्षीय युवक आणि 47 वर्षीय पुरुष असे दोन बाधित वाढले आहेत.








