सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाच्या कालावधीत सातारा पालिकेच्या ज्या 2-3 ऑनलाईन सभा झाल्या, त्याही उरकत्या घेतल्याचा आरोप नविआकडून होत आहे. एक सभा तर सुरु होण्यापूर्वीच स्थगित करण्यात आली होती. त्यावर सभा घेण्यात आली नव्हती. आता निवडणूका जवळ येताच पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने तातडीने घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, ही सभा दि. 3 सप्टेंबर रोजी होत आहे. त्या सभेकरता 58 विषयांचा अजेंडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ही सभा तरी होणार की गुंडाळली जाणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
नविआकडून सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, सत्ताधारी साविआकडून कोरोनाच्या निकषामुळे ऑफलाईन सभा घेण्यात येत नाही. 3 फेब्रुवारीनंतर सातारा पालिकेची सभा होत आहे. या सभेच्या अजेंडय़ावर तब्बल 54 विषय आहेत. यामध्ये पालिकेच्या हद्दीत सर्व्हे नं. 337 करंजे तर्फ सातारा मधील प्लॉट क्र. 1 ते 14 धारकांनी न्यायालयात दाखल केलेल्या दिवानी दाव्याच्या निकालावर तडजोड करण्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेणे, हा विषय सुरुवातीलाच गाजणार आहे. करंजे एमआयडीसी भूखंड प्रकरण गेल्या कित्येक वर्षापासून गाजत असून त्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची शक्यता आहे. शहरातील 20 प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी असलेल्या घंटागाडय़ांची देखभाल, दुरुस्ती, गाडी चालकांचे पगार, कामगार, डिझेल याचे बिल काढण्याचा विषय, आरोग्य विभागातील विविध कामांच्या निविदा, घंटागाडीमार्फत कचरा गोळा करुन तो सोनगाव कचरा डेपोत टाकण्याकरता नवीन वार्षिक दरपत्रक मागवण्याची विषय, ओडीएफ प्लस बाबत निर्णय घेणे, गोडोली येथील जिजाऊ उद्यानातील दुरुस्तीच्या कामासाठी 14 लाख 62 हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसवणे आदी 58 विषयांवर चर्चा होणार आहे.









