स्थायीमध्ये ऍड. बनकर, सुजाता राजेमहाडिक, दीपलक्ष्मी नाईक यांना संधी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडी पीठासन अधिकारी तथा प्रशासन अधिकारी रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडल्या. पाणी पुरवठा सभापतीपदी यशोधन नारकर तर आरोग्य सभापतीपदी अनिता घोरपडे यांची वर्णी लागली आहे. बांधकामचे सभापतीपद हे मिलिंद कदम यांना लॉटरी लागली आहे. निवडीचा जल्लोष कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, ‘तरुण भारत’ने निवडीपूर्वी सभापती कोण होईल ही नावे जाहीर केली होती. अंदाज तंतोतंत खरा ठरला.
पालिकेच्या सात विषय समित्यांच्या सभापतींची मुदत संपल्याने निवडीकरता कार्यक्रम लागला होता. त्यानुसार निवडीचा कार्यक्रम नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. सकाळी 10 ते 12 या दोन तासात अर्ज दाखल करणे होता. त्यानंतर पाच मिनिटात छाननी व अर्ज माघार अशी मुदत पीठासन अधिकारी पवार यांनी दिली. परंतु बनकर यांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये कोणताही अर्ज बाद झाला नाही. रवी पवार यांनी सर्वच समित्या गठीत करुन सभापतीपदाची नावे जाहीर केली. त्यानुसार आरोग्य सभापतीपदी अनिता घोरपडे, पाणी पुरवठा सभापतीपदी यशोधन नारकर, शिक्षण सभापतीपदी उपाध्यक्ष किशोर शिंदे, बांधकाम सभापतीपदी मिलिंद काकडे, नियोजन सभापतीपदी ज्ञानेश्वर फरांदे, महिला व बालकल्याण सभापतीपदी सुनिता पवार, उपसभापती संगिता आवळे यांची निवड करण्यात आली. स्थायी करता साविआतून ऍड. दत्ता बनकर आणि सुजाता राजेमहाडिक यांची तर नविआतून दीपलक्ष्मी नाईक यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. निवडीवेळी जुने सभापतीही उपस्थित होते.









