सरकारचे न्यायालयास आश्वासन
प्रतिनिधी / मडगाव
पालिका निवडणूक अधिसूचनेपूर्वी नगरपालिका निवडणुकांचे आरक्षण तीन आठवडय़ापूर्वी जाहीर केले जाईल, असे सरकारचे म्हणणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मान्य केले आहे. उच्च न्यायालयाने अधिकाऱयांना त्यानुसार कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
गोवा फॉरवर्डचे फातोर्डा गटाध्यक्ष सूजय लोटलीकर यांनी पालिका प्रभाग आरक्षणांसदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने याचिका निकालात काढताना वरील निवाडा दिला आहे.
फातोर्डा येथे गोवा फॉरवर्डने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत व गटाध्यक्ष सूजय लोटलीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार फसवणूक करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप केला.
2015 ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून याचिका
2015 मध्ये भाजपने पालिका निवडणुकांसाठी एक दिवस असतानाच प्रभागाचे आरक्षण केले व विरोधकांना उमेदवार नक्की करण्यासाठी संधी मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली होती. तरीसुद्धा गोवा फॉरवर्ड पक्षाने युवा नेतृत्वाला संधी दिली व पालिका निवडणुकीत बाजी मारली होती. 2015 ची परिस्थिती यावेळी सुद्धा पुन्हा केली जाण्याची शक्यता होती. म्हणून नोव्हेंबर महिन्यात या सदंर्भात गोवा फॉरवर्डच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती, असे काम म्हणाले.
न्यायालयाने सरकारचे म्हणणे उचलून धरले
या याचिकेवर सुनावणी झाली असता सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे दोन वेळा पुढील तारीख मागण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने सरकारी वकिलांना, सरकारचे म्हणणे न्यायालयासमोर मांडण्यास सांगितले असता, पालिका निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वी किमान तीन आठवडे म्हणजे 21 दिवस अगोदर प्रभाग आरक्षण जाहीर केले जाईल अशी माहिती न्यायालयात देण्यात आली. ही माहिती न्यायालयाने उचलून धरली. त्याचबरोबर अधिकाऱयांना त्यानुसार कार्य करण्याचे निर्देश देखील दिले. त्यामुळे पालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांवर आत्ता अन्याय होणार नसल्याचे दुर्गादास कामत म्हणाले. भाजपने केवळ फसवणूक करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेत असल्याचे सांगून भाजपने प्रचार केला व अवघ्या चार-पाच दिवसांत निवडणूक घेतली. त्यामुळे विरोधी पक्षांना प्रचार करता आला नाही. असा प्रकार पालिका निवडणुकीत होऊ दिला जाणार नाही. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पालिका संचालनालयावर गोवा फॉरवर्डची नजर असेल असा इशारा दुर्गादास कामत यांनी यावेळी दिला आहे. यावेळी सूजय लोटलीकर उपस्थितीत होते.









