प्रतिनिधी / वास्को
मुरगाव पालिका क्षेत्रात रस्तो रस्ती आणि नाक्यांनाक्यावर कचऱयाचे ढिगारे वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पालिका कामगारांचा संप काल चौथ्या दिवशीही चालूच राहिला. संध्याकाळपर्यंत या प्रश्नावर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. आज या संपाचा पाचवा दिवस आहे. या संपामुळे सार्वजनिक ठिकाणी गलिच्छतेबरोबरच लोकांची अनेक प्रकारची कामेही खोळंबलेली आहेत.
मुरगाव पालिका कर्मचाऱयांना पुन्हा पुन्हा वेतनाच्या मागणीसाठी काम बंद करावे लागत असून यावेळी हा काम बंद संप बराच लांबलेला आहे. सोमवारपासून मुरगावचे पालिका कामगार काम बंद ठेऊन संपावर आहेत. त्यामुळे पालिका क्षेत्रातील सफाईची कामे पूर्णपणे ठप्प झालेली असून कार्यालयातील प्रशासकीय कामेही ठप्प आहेत. स्वच्छतेअभावी दुर्गंधी सुरू झालेली आहे. एकीकडे गलिच्छतेची समस्या तर दुसरीकडे पालिका कार्यालयात लोकांची कामेही अडलेली आहेत. त्यामुळे पालिका कामगारांचा संप कधी एकदाचा संपतो काय म्हणून लोक प्रतिक्षा करीत आहेत. वेतनाअभावी काम बंद ठेवून बसलेले पालिका कामगार व कर्मचारी मंत्री, आमदार व त्यांचे सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही हालचाली करीत नसल्याने नाराज आहेत. सरकारतर्फे कुणी विचारपुसही करीत नसल्याची भावना काही कामगारांनी व्यक्त केली. गुरूवारी या कामगारांची वास्कोतील आम आदमी पाटींच्या परशुराम सोनुर्लेकर व इतरांनी भेट घेऊन त्यांना पाठींबा व्यक्त केला.
रस्तो रस्ती आणि नाक्या नाक्यांवर कचऱयामुळे गलिच्छता, चिंता वाढली
काल चौथ्या दिवशीही संपामुळे पालिकेचा व्यवहार ठप्प राहिला. पालिका मंडळ अस्तित्वात नसल्याने लोकांची वेगळी अडचण झालेली आहे. पूर्वी नगरसेवकांकडे तक्रारी करणे किंवा त्यांना दोष देण्याचा अधिकार लोकांकडे होता. सध्या लोकांना कचऱयाच्या प्रश्नावर किंवा पालिकेतील बंद कामकाजासंबंधी कुणाला जाब विचारायचीही संधी राहिलेली नाही. पालिका कामगारांना वेतनाची चिंता लागलेली आहे. तर पालिका क्षेत्रातील लोकांना वाढत्या गलिच्छतेची काळजी वाटू लागली आहे. कचऱया घरात ठेवणे शक्य होत नसल्याने लोक हा कचरा बाहेर फेकीत आहेत. त्यामुळे सध्या पालिका क्षेत्रातील रस्तोरस्ती आणि नाक्यानाक्यावरही कचऱयाचा पसारा आणि ढिगारे दिसून येत आहेत. दुर्गंधी वाढत आहे. मासळी मार्केट, चिकन मटण मार्केट, भाजी मार्केट यांच्यासमोर कठीण समस्या उभी राहिलेली आहे. हॉटेल व्यावसायीकांचीही चिंता वाढलेली आहे. पालिका कामगारांच्या वेतनाचा प्रश्न त्वरीत सोडवण्याची गरज आहे. अन्यथा पालिका क्षेत्रात गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुरगाव पालिकेचा पेचप्रसंग सोडवण्याची जबाबदारी नगरविकासमंत्र्यांची- आमदार कार्लुस आल्मेदा
स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्कोत एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुरगाव पालिका कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नामुळे निर्माण झालेला पेचप्रसंग सोडवण्याची जबाबदारी नगरविकासमंत्री या नात्याने मुरगावचे आमदार मिलिंद नाईक स्विकारायला हवी. त्यांनीच या प्रश्नात लक्ष घालायाला हवा. आपल्याला या प्रश्नाची चिंता आहे. मात्र, आपण आमदार म्हणून अधिक काही करू शकत नाही. मंत्र्यानीच हा प्रश्न सोडवावा अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.
पालिका ही स्वतंत्र संस्था, त्यानीच पेचप्रसंग सोडवावा- नगरविकासमंत्री मिलिंद नाईक दरम्यान, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांना मुरगाव पालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाविषयी विचारले असता, पालिका ही स्वतंत्र संस्था असल्यामुळे हा प्रश्न सोडवणे पालिकेचेच काम असल्याचे स्पष्ट केले. महसुल कुठून, किती आणि कसा मिळवायचा, कसा वाढवायचा याचा विचार पालिका प्रशासनानेच कारायला हवा. त्यामुळे कामगारांना वेतन देण्याची समस्या निर्माण होणार नाही. सरकार पालिकांप्रती वेतन निधी, विकास निधी व इतर जबाबदाऱया पार पाडीत असते. पालिकेचा कुठलाही निधी देण्याचा राहिलेला नाही. नगरविकासमंत्री म्हणून जे जे काही करणे शक्य आहे ते मी करीत आलेलो आहे. सरकारी संस्था सुडातर्फे प्रकल्प उभारून पालिकेकडे देण्यात येतात. त्यातूनही पालिका आपला महसुल उभा करू शकते. सध्या निर्माण झालेल्या स्थितीची सर्वात प्रथम दखल ही पालिकेनेच घ्यायला हवी असे मंत्री मिलिंद नाईक म्हणाले.









