
वार्ताहर /पालये
बोडक्याच्या माथ्यार ठेयलो नळो, बोडको नाचता सगळो मळो, पालये गाव रे वेतोबाचा नाव रे, शबैचा बावला तारीकडे पावला शबै, आम्या तुजो ताळो टाळयेर रे, पालयेकरांचा रोमाट रे, आज दिन मौजेचा, ओस्सय, ओस्सय आदी एकापेक्षा एक जती तसेच लोकगीते सादर होवून पालये येथील श्री भूमिका वेताळ मंदिराचा शिमगोत्सव रंगतदार ठरला.

शिमगोत्सव दरम्यान श्री भूमिका वेताळ मंदिरात घुमटवादनाचा कार्यक्रम झाला. होळीच्या तिसऱया दिनी हळदोणी होवून हरिजनबांधवांचे रोमट झाले. तद्नंतर दोन सत्रांत संध्याकाळी व रात्री रोमट कार्यक्रम झाला. सहाव्या रात्री रोमटाच्या समारोपप्रसंगी रात्री चित्ररथ मिरवणूक झाली. विविध रूपडी घालून वेशभूषा करून रोमटय़ांचा सहभाग होता. धुळवडीदिनी महादेव मंदिरानजिकचा होळीवरचा नारळ काढण्यासाठी चढाओढ झाली. रात्री तिळवेवाडय़ातर्फे सवाद्य वर मिरवणूक झाली. दरम्यान, शिमगोत्सव काळात रात्री उशिरा दशावतारी नाटके झाली. यात ओंकार दशावतारी मंडळ (वेंगुर्ला) व जय हनुमान दशावतारी मंडळ (आरोस-सिंधुदुर्ग) यांचा सहभाग होता. ही नाटके भंडारवाडा, मधलावाडा, देऊळवाडा व किरणपाणी यांच्या सौजन्याने झाली.
दरम्यान, रात्री पालये ग्रामपंचायतीतर्फे चित्ररथ व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. किरणपाणी रोमटी मेळातर्फे साई भंडारा तसेच भंडारवाडा मेळातर्फे जरासंध वध देखावा सादर करण्यात आला. विविध वेशभूषा करून रोमटी कलाकारांनी उपस्थितांना रिझवले. यात काशिनाथ परब (बाई), योगेश हरमलकर (छ. शिवाजी महाराज), प्रसाद तातो परब (प्रंटलाईन वर्कर), दर्श विष्णू नाईक (वेताळ), क्रिशा कृष्णकांत नाईक (महालक्ष्मी), कृष्णकांत शशिकांत नाईक (राखणदार), साईराज ज्ञानेश्वर परब (बाजी प्रभू), संदेश परशुराम नाईक (साईबाबा) यांचा सहभाग होता. दरम्यान, शिमगोत्सवात पारंपरिक शबय प्रथाही झाली.









